#

Advertisement

Thursday, November 10, 2022, November 10, 2022 WIB
Last Updated 2022-11-10T11:47:07Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

शिंदे गट महिला आघाडी पायाभरणी? "बहुजन रयत परिषदे'ची भूमिका ठरणार मोठी

Advertisement

खासदार श्रीकांत शिंदे आणि ऍड. कोमल अजय साळुंखे-ढोबळे यांच्या भेटीनंतर चर्चा

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची सदिच्छा भेट बहुजन रयत परिषद महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे व अजय साळुंखे यांनी घेतली. ही भेट म्हणजे आगामी काळात शिंदे गटाच्या महिला आघाडीची पायाभरणी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मुंबई येथे वर्षा निवासस्थानी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची झालेली ही भेट काही कामानिमित्त असल्याचे बहुजन रयत परिषदेच्या प्रवक्‍त्यांकडून सांगितले जात असले तरी यामागे मोठी राजकीय उलटफेर असल्याचे स्पष्ट होत आहे. याभेटी वेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने, उद्योगपती मधुकर मुसळे आदी उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील शब्दप्रभू माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे या कन्या आहेत. राष्टवादी कॉंग्रेसशी फारकत घेऊन भारतीय जनता पक्षात स्थिरावलेले प्रा. लक्ष्मण ढोबळे हे सोलापूरात लोकसभा 2024चे भाजपचे उमेदवार असू शकतील, असे भाकित केले जात आहे. तर, त्यांच्या कन्या ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांना मंगळवेढा मतदार संघातून विधानसभेची उमेदवारी मिळू शकते. या पार्श्‍वभूमीवर "ढोबळे' घराण्याकडून सोलापूर जिल्ह्यासह मंगळवेढा मतदारसंघात भक्कम पायाभरणी करण्यात आली आहे.
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे संस्थापक असलेल्या बहुजन रयत परिषदेची संपूर्ण जबाबदारी सध्या ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे याच सांभाळत आहेत. राज्यभरात बहुतांशी जिल्ह्यात तसेच तालुका पातळीवर बहुजन रयत परिषदेची भक्कम पकड आहे. त्यामुळे निवडणुकांच्या काळात या परिषदेने आपल्या सोबत असावे, असे अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना वाटते. परंतु, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी भाजप पक्षामध्ये आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे बहुजन रयत परिषद अन्य कोणत्याही पक्षाच्या दावणीला बांधली जाणार नाही, असे महिला प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी अनेकदा जाहीर कार्यक्रमातून स्पष्ट केले आहे.
सध्या, महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे गटाची सत्ता असल्याकारणाने बहुजन रयत परिषदेकडून शिंदे गटाला नव्हे तर या सरकारला पाठींबा असल्याचे परिषदेच्या प्रवक्‍यांकडून अनेकदा स्पष्ट केले गेले आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी घेतलेली भेट याच कारणासाठी असल्याचेही सांगितले गेले. परंतु, बहुजन रयत परिषदेचा पाठींबा सरकारला असला तरी शिंदे गट मजबूत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून अर्थातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बहुजन रयत परिषदेच्या रूपात रसद पुरविली जाऊ शकते, त्यामुळे आगामी काळात ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे या शिंदे गटाच्या "महिला बटालियन'मध्ये दिसल्या तर राजकारण्यांना नवल वाटण्याचे काहीच कारण नाही, असेही अनेकांकडून सांगितले जात आहे.