Advertisement
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मैदानात उतरले आहेत. या प्रकरणात अजित पवार यांच्यासह एकूण 75 जणांना दोन वर्षांपूर्वी क्लीन चीट देण्यात आली होती. मात्र आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं याप्रकरणात नव्यानं तपास सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. मुंबई सत्र न्यायालयात सुरू असलेली या प्रकरणाची सुनावणी आज 3 डीसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. परंतु दोन वर्षांपूर्वी या प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह एकूण 75 जणांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेनं क्लीन चीट दिली होती. मात्र आता पुन्हा एकदा या प्रकरणाचा नव्यान तपास सुरू करण्याची परवानगी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेकडून मागण्यात आली आहे. अण्णा हजारे यांच्या वकिलांनी EOW चा C समरी रिपोर्ट अर्थात क्लोजर रिपोर्ट रद्द करण्याची मागणी केली आहे. हा रिपोर्ट रद्द केल्याशिवाय, EOW पुन्हा नव्यानं कसा तपास करणार ? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे शिखर बँकेंच्या सर्व संचालकांविरोधात प्रोसेस इश्यू करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
