Advertisement
मुंबई : विधान परिषद निवडणुकीवरून महाविकासआघाडीत सुरू झालेली खडाखडी अजूनही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. महाविकासआघाडीची आजची बैठक रद्द करण्यात आली आहे. नागपूर आणि नाशिक विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात मतभेद आहेत, त्यामुळे आजची बैठक रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्यामुळे एनसीपीने आधीच या बैठकीतून काढता पाय घेतला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आधीच साताऱ्याला निघून गेले.
विधान परिषदेच्या पाच जागांपैकी अमरावती-नाशिकची जागा काँग्रेसला, मराठवाड्याची राष्ट्रवादीला, नागपूरची शिवसेना ठाकरे गटाला आणि कोकणातली शेतकरी कामगार पक्षाला देण्यात आली. पण नाशिकमध्ये सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून फॉर्मच भरला नाही. याऐवजी सुधीर तांबे यांचे पूत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत पक्षामध्ये बंड केलं.
सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला, पण काँग्रेसने मात्र आपली भूमिका महाविकासआघाडीच्या बैठकीनंतर स्पष्ट करू असं सांगितलं, पण ही बैठकच आता रद्द झाली आहे.
