Advertisement
नांदेड : माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या मंत्री पदाच्या लेटरहेडचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तींनी बदनामीकारक बनावट पत्रे तयार केले असल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पोलिसांत केली आहे. एवढेच नव्हे तर आपल्यावर पाळत ठेवली जात असून, घातपात घडविण्याचाही प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे. ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळातील काही शासकीय पत्रे मिळवून अज्ञात व्यक्तींनी त्यातील सही कायम ठेवून आणि मूळ मजकूर मिटवून बनावट कोरे लेटरहेड तयार केले आहे.
विशेष म्हणजे या बाबीची कुणकुण त्यांना अगोदरच लागली होती. फक्त स्वाक्षरी असलेले एक कोरे लेटरहेडही त्यांना मिळाले होते. त्यामुळे त्यांनी यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानुसार त्या प्रकरणाची 31 जानेवारीपासून पोलीस चौकशीही सुरू झाली आहे. मात्र, आज अशाच बनावट कोऱ्या लेटरहेडवर मराठा आरक्षणासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले एक खोटे पत्र मिळाल्याने चव्हाण यांनी तातडीने नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची भेट घेऊन याबाबत लेखी तक्रार दाखल केली.
