Advertisement
नागपुर : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरासमोर बॉम्ब पेरल्याचा दावा करणारा कॉल नागपूर पोलिसांना आला. रात्री दोन वाजता आलेल्या या कॉलमुळे मोठी खळबळ माजली. पोलिसांनी कसून शोध घेतला असता तिथे बॉम्ब ठेवला नसल्याचे आढळले. पोलिसांनी हा फेक कॉल करणाऱ्याला नागपुरातून अटक केली आहे.
दरम्यान फडणवीसांच्या घराबाहेर सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही धागेदोरे हाती लागतात का याचा शोध सुरु केला आहे. फडणवीस यांना धमकीचा फोन आल्याचे पोलीस कंट्रोल रुमला फोन आला होता. चौकशीनंतर एका तरुणाला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
धमकीचा फोन कॉल आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा कामाला लागली. फडणवीस यांच्या घरी बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांचा फौजफाटा रात्री तैनात करण्यात आला होता. दरम्यान, धक्कादायकबाब म्हणजे घरची लाईट गेली म्हणून वैतागून त्याने पोलिसांना धमकीचा फोन केला होता. त्यानंतर हा फोन कट झाला. यावेळी पोलीस यंत्रणा सतर्क झाली. फडणवीस यांच्या घरी बॉम्ब शोधक पथक पाठवण्यात आले. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला याणि घराची पूर्णपणे तपासणी केली.
