Advertisement
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा दावा
रावेर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज रावेरमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. हा हल्ला चढवतानाच त्यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरही जोरदार टीका केली. एकनाथ खडसे हे भाजप सोडणारच होते. सुनेला तिकीट जाहीर झाल्यानंतर खडसे राष्ट्रवादीत थांबणारच नव्हते, असा दावाच प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
महाविकास आघाडीत रावेर लोकसभेची जागा एकनाथ खडसे यांच्यासाठी सोडण्यात आली होती. पण खडसे पक्ष सोडून जाणार होते. सुनेला जागा मिळाल्यानंतर सासरे थोडेच थांबणार होते. शरद पवार यांना माझं आवाहन आहे. तुमच्याकडे एखादी मशीन आहे का? मशीनमध्ये टाकल्यावर नेते साफ होतील अशी, अशी उपरोधिक टिप्पणी करतानाच एकनाथ खडसे यांना पक्षात घेऊ नका, असं मी शरद पवार यांना सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
रावेरमध्ये प्रचार रॅलीला संबोधित करताना प्रकाश आंबेडकर यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. एकनाथ खडसे यांना सर्व कळतं. खडसेंनी स्वत:च्या वापरासाठी बरोबर हुशारी केली. एकनाथ खडसे राष्ट्रवादीतून उठले आणि पुन्हा भाजपात गेले आणि हे नीतिमत्तेचे राजकारण करतात. खडसे यांनी आयाराम गयारामचं राजकारण केलं, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
