Advertisement
सोलापूर : देशभरात सध्या नीट परीक्षेतील गोंधळाबाबत चर्चा सुरू आहे. नीटच्या पेपर फुटीने शिक्षण क्षेत्राला कलंक लागला आहे. रात्र-रात्र जागून कष्टाने परीक्षा देणारे प्रामाणिक विद्यार्थी एका बाजूला तर धनिक बापांची निवडक मुले संपत्तीच्या जोरावर पेपर फोडणारे व चोरणारे खुशाल चेंडू दरोडेखोर दुसऱ्या बाजुला, असा संघर्ष विकोपाला गेला. नीट परीक्षेचा काळा धंदा करणाऱ्यांची पाळेमुळे खोदण्याचे काम सरकार करीत आहे. अशा कलंकीत प्रवृत्तीला वठणीवर आणून उच्च शिक्षण क्षेत्राला वळींब्यात ठेवणारा कायदा जन्माला आला. ते एका अर्थाने बरेच झाले असल्याचे मत माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून शिक्षणाचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच नीट परीक्षेचा सन्मान राखत पेपर फुटीसाठी दहा वर्षांच्या कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यात शेतकरी हिताची जपणूक करीत शेतकऱ्यांच्या आणि बहुजनांच्या हितासाठी केंद्र सरकार काम करत असताना शेतकऱ्यांच्या मुलाच्या कष्टाचे चीज करण्यासाठी पेपर फुटीच्या गुन्हासाठी जबर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
स्पर्धा परीक्षेच्या इतिहासात प्रथमच मोदी यांच्या कार्यकाळात आदर्श परीक्षेची प्रतिष्ठा राखली गेली. परंतु. आता परीक्षेच्या पावित्र्याला कलंकीत करणारे मध्यस्थ आणि दलाल यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. कष्टाळू गुणवंत विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर करायला हवा. पेपर फुटीला आधार देणारे आणि कोटीत व्यवहार करणारे पोरांचे धनिक बाप आणि संपत्तीच्या मस्तीने दलालाला आधार देणारे, काळ्या धंद्याला उत्तेजित करून मलिदा वाटून पोराला डॉक्टर करायचे आणि डॉक्टरचा बाप म्हणून मिरवणे सोपे गेले. परंतु या काळ्या घटनेत गुणवंत पोरांची निराशा झाली. अवघ्या देशातला शिक्षणातला दर्जा घसरला असून तो राष्ट्रहिताला घातक ठरेल. यासाठीच परीक्षेच्या पावित्र्याला कलंकीत करणाऱ्या दलालाला शिक्षा झालीच पाहिजे. कारण त्यांनाही पेपर फुटीची झळ लागलीच पाहिजे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. मासिक लाखापेक्षा अधिक पगार घेणारे महाभाग अशा मोठ्या घबाडाला बळी पडल्याचे दिसून येते. यावर केंद्राच्या शिक्षणमंत्र्यांनी कोटीच्या घरात दंड केला असून, डोहाळ जेवणाची रक्कम बाहेरच्या बाहेर निघावी म्हणून शिक्षकांनी केलेले पाप साने गुरुजीच्या आत्म्याला धक्का देणारे आहे. यामुळेच नाणे गुरुजींनी केलेले पाप साने गुरुजीला झेपणारे नसून सात्वीकपणाच्या आदर्शाला फाशी देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.
