Advertisement
पिंपरी : रिल्स, युट्युब व सोशल मीडियातून तरुणाईला प्रेरणादायी सल्ला आणि उपदेश देण्याचे काम चैतन्य महाराज वाडेकर करतात. मात्र,दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषण अशीच काही महाराजांची अवस्था झालीय. त्यामुळेच पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराजांना एका प्रकरणात अटक केली आहे.
बिल्डर आणि चैतन्य महाराज यांच्यात एका जागेवरुन झालेल्या वादातून चैतन्य महाराज व त्यांच्या भावांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराजांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांसमोर महाराजांनी आपण किती फेमस आहोत, आपला मोठा चाहता वर्ग आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी आपला इंगा दाखवत युवा महाराजांना अटक केली आहे.
कोण आहेत चैतन्य महाराज वाडेकर
चैतन्य महाराज वाडेकर यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. युवा किर्तनकार हभप चैतन्य महाराज यांचा जन्म खेड तालुक्यातील भांबोली गावात 17 ऑक्टोबर 1994 साली झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण संत ज्ञानेश्वर विद्यालय, आळंदी येथे झाले असून संत साहित्याचे शिक्षणही त्यांनी येथेच पूर्ण केले. एप्रिल 2021 मध्ये त्यांचे लग्न झाले. इंस्टाग्राम आणि युट्युबवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. तसेच, चैतन्य महाराज हे मदालसा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष आहेत.
