Advertisement
मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार तसेच पक्ष प्रवक्ते संजय राऊत यांनी महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार आहे, असं सूचक विधान केलं आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हे विधान करताना विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाक्षावर निशाणा साधला आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर निशाणा साधला. बाळासाहेबांची शिवसेना फोडून अमित शाहांनी समांतर शिवसेना तयार केली आहे. एकनाथ शिंदेंचं प्रकरण फार गांभीर्याने घेऊ नये. त्यांनी स्वत:च्या पालकमंत्रिपदाचा वाद सोडवावा. काल ते मुख्यमंत्री होते. आता ते उपमुख्यमंत्री आहेत. उद्या ते ही राहणार नाहीत, हे पण मी तुम्हाला सांगतो, असं संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना, शिंदे उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत कारण तिसरा उपमुख्यमंत्री लवकरच महाराष्ट्राला मिळतोय आणि तो त्यांच्याच पक्षातला आहे, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांच्या विधानाचा रोख शिंदेंच्या पक्षातील आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतांकडे असल्याचं सांगितलं जात आहे.
राऊत आणि सामंतांमध्ये वाद काय?
राऊत आणि उदय सामंतांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील 15 आमदार हे उदय सामंत यांच्या सोबत आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. एकनाथ शिंदे पुन्हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देणार असल्याचं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं. येत्या तीन महिन्यांत शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 10 माजी आमदार, काही जिल्हाप्रमुख तसेच काँग्रेसचे काही माजी आमदार-खासदार आणि पदाधिकारी शिवसेनेत सामील होतील असा दावा उदय सामंतांनी परदेश दौऱ्यावर असताना केला. यावरुन संजय राऊत चांगलेच संतापले.
