Advertisement
सोलापुर : माळशिरसमध्ये मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी EVM मशीनच्या मतदानावर आक्षेप नोंदवत थेट मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे मारकडवाडी हे गाव चर्चेत आले होते. आता मारकडवाडीनंतर धानोरे गावातून ईव्हीएमला विरोध करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या गावात आवाजी मतदानही पार पडल्याचा प्रकार समोर आला आहे.
पंढरपुरातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावानंतर धानोरे गावातून ईव्हीएमला विरोध करण्यात आला आहे. माळशिरस तालुक्यातील धानोरे गावात हात उंचावून आवाजी मतदान पार पडले. उत्तमराव जानकर यांना धानोरे गावातून EVM मध्ये 963 मते पडली होती. मात्र हात उंचावून प्रत्यक्ष मतदान घेतल्यानंतर 1206 मते पडल्याचे समोर आले आहे. यानुसार एकूण 243 मतांचा फरक पडला आहे. धानोरे आणि मरकडवाडी गावातील हजारो मतदारांनी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे असे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाच्या नावे तयार केले आहे. लवकरच हे प्रतिज्ञापत्र बच्चू कडू आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर निवडणूक आयोगाला प्रत्यक्ष नेऊन देणार आहेत.
जर ईव्हीएम मशीनला ट्रॅप लावला नसता तर अजित पवार 20 हजार मतांच्या फरकांनी पडले असते. या ट्रॅपमुळेच अजित पवार विजय झाल्याचाही आरोप उत्तमराव जानकर यांनी केला. अजित पवार यांच्यावरच आता रडायची वेळ येईल हा उत्तम जानकर आहे, अजित पवार यांनी लक्षात ठेवावे. हा या विषयाचा तळ गाठणार आहे, असेही ते म्हणाले.
