Advertisement
शिंदेंचा सत्कार केल्याने होणाऱ्या टीकेला जितेंद्र आव्हाडांनी दिलं उत्तर
मुंबई : शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव' पुरस्कार देण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सातत्याने टीका केली जात आहे. संजय राऊत यांनी शरद पवारांनी शिंदेंचा असा सन्मान करणं दुर्देवी आहे असल्याचं म्हटलं आहे. त्यातच आता जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेतल्याची आठवण त्यांनी करुन दिली आहे.
संजय राऊतांच्या टीकेवर आव्हाड म्हणाले, त्यांच्या मनात शिवसेना फोडणं आणि सरकार पाडण्याच्या वेदना खूप आहेत. त्या वेदना असताना शरद पवारांनी कसं वागायलं हवं हे सांगणंही उचित नाही. शरद पवार तुम्हाला कोणाला भेटावं सांगतात का? त्यांनी कधी आक्षेप घेतला आहे का? आम्हालाही उद्धव ठाकरे अजित पवारांसोबत असतात तेव्हा वाईट वाटतं. सर्वात जास्त धोका अजित पवारांनी दिला आहे. मग तुम्ही कसे भेटायला गेलात हे आम्ही किंवा शरद पवरांनी तुम्हाला विचारलं का? राजकारणात असं चालत नाही.
आव्हाड म्हणाले, विधानसभेचं अधिवेशन सुरु असताना आम्ही सर्व विरोधी पक्षाचे नेते एकत्र बसलो होतो. आमच्या समोर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले. तेव्हा लोकांनी मला विचारलं हे कसं काय? तेव्हा मी भेटायलाच पाहिजे, संवाद ठेवायलाच पाहिजे असं सांगितलं होतं. सर्वात मोठा पक्ष म्हणून जो विरोधी पक्षात आहे, त्यांच्या नेत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेणं क्रमप्राप्त आहे. जो संवाद तुटला आहे, तो व्हायलाच हवा. आमच्या पक्षातून गेलेल्या अजित पवारांनाही ते भेटले होते, आम्ही कुठे काय बोललो होतो? तुम्ही व्यासपीठ शेअर केलं. भेटलात म्हणून त्यांचे झालात असं होत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणतील सोज्वळ, सुशील आणि त्यानुसार जे वागणं व्हायचं ते दिसत नाही.
