Advertisement
दिल्ली : भारताच्या फाळणीनंतर, कलात राज्य म्हणजेच बलुचिस्तान सुमारे 227 दिवस स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य राहिले. बलुचिस्तानला पाकिस्तानात सामील व्हायचे नव्हते आणि पाकिस्तानचे संस्थापक मुहम्मद अली जिनाही याच्याशी सहमत होते. सध्याचा बलुचिस्तान तीन देशांमध्ये विभागलेला आहे. यामध्ये पाकिस्तानचा बलुचिस्तान प्रांत, इराणचा सिस्तान-बलुचिस्तान प्रांत आणि अफगाणिस्तानमधील एक छोटासा भाग समाविष्ट आहे. पाकिस्तानने बलुचिस्तानमधील ग्वादर बंदर चीनला दिले आहे आणि स्थानिक बलुच लोक त्याचा निषेध करत आहेत.
अफगाणिस्तानात, निमरुझ, हेलमंड आणि कंधार हे बलुचिस्तानचा भाग राहिले आहेत. बलुच हे सुन्नी मुस्लिम आहेत. शियाबहुल इराणच्या बलुचिस्तानमध्येही, बलुच सुन्नी मुस्लिम आहेत.
पाकिस्तान सरकार विरुद्ध बलुची बंडखोर असा हा संघर्ष आहे. पंजाब, सिंध तसेच खैबर पख्तुनवा प्रांतांच्या तुलनेत मिळणारी कमीपणाची वागणूक, विकास प्रकल्प तसेच रोजगाराची वानवा असे अनेक प्रश्न घेऊन बलुची बंडखोर लढत आहेत. मात्र प्रत्येक वेळी पाकिस्तान सरकार त्यांचं बंड मोडून काढण्यासाठी सज्ज असतं. बलुची बंडखोर त्याला बलुचिस्तानची गळचेपी समजतात.
क्षेत्रफळानुसार बलुचिस्तान हे पाकिस्तानचे सर्वात मोठे राज्य आहे, जे देशाच्या अंदाजे 44 टक्के क्षेत्र व्यापते. सर्वात मोठे राज्य असूनही, त्याची लोकसंख्या फक्त 1.5 कोटी आहे. पाकिस्तानमध्ये सोने, तांबे, तेल आणि इतर अनेक मौल्यवान धातुंच्या खाणी बलुचिस्तानमध्ये आहेत. तरीदेखील बलुचिस्तान हे सर्वात मागास राज्यांपैकी एक आहे. पुन्हा एकदा स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी केली जात आहे. भारताने स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत करावी अशी बलुचिस्तानची अपेक्षा आहे.
आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली तरच कोणाताही प्रदेश नवीन देश बनू शकतो. 1933 च्या मोंटेव्हिडिओ कन्व्हेन्शननुसार, कोणत्याही नवीन देशासाठी काही अटी असतात. जसे की कायमस्वरूपी लोकसंख्या, सीमा, सरकार आणि इतर देशांशी संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा मार्ग इतका सहज सोपा नाही. कारण, पाकिस्तान कधीही इतक्या सहजपणे बलुचिस्तानवरील आपले वर्चस्व सोडणार नाही.
