Advertisement
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची सूचना : स्थानिक स्वराज संस्थांसाठी तयारी करण्याचे दिले आदेश
पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्या असल्या तरी या वर्ष अखेरपर्यंत राज्यशासन कधीही निवडणूक जाहीर करू शकते. आपल्या बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी करावी, महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती कोणतीही निवडणूक कुठल्याही पक्षातून लढा परंतु, आपल्या बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी निवडून आले पाहिजेत. आपल्या संघटनेचे अस्तित्व दिसायला हवे, अशी अपेक्षा माजी मंत्री तथा बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केली.
राज्यभरातील बहुजन परिषदेच्या जिल्हाध्यक्ष तसेच तालुकाध्यक्ष यांची बैठक भोसरी येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी संस्थापक अध्यक्ष ढोबळे बोलत होते. ते म्हणाले की, समाजाने आपली दखल घ्यावी असे वाटत असेल तर त्यांचे प्रश्न, समस्या सोडवायला हव्यात. वेळ प्रसंगी आंदोलन, मोर्चे यातून संघटनेची ताकद दाखवून द्यायला हवी, सामान्यतील सामान्य प्रश्नही आपण शासकीय अधिकाऱ्यांपुढे निवदेनाच्या स्वरूपात मांडले तरीही लोक तुम्हाला लक्षात ठेवतील. मला कोणता तरी पक्ष बोलवेल आणि मला उमेदवारी देईल, अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा तुम्ही तुमचे महत्त्व तुमच्या कामातून दाखवून द्यायला हवे. राजकीय पक्षच म्हटले पाहिजेत की, ह्या पोराला निवडणुकीला उभ करा. एवढे आपले काम भक्कम असले पाहिजे. आत्ताची राजकीय परिस्थिती बदलली आहे, त्यामुळे जनतेच्या कामातूनच आपण आपले अस्तित्व दाखवून दिले पाहिजे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुस्तके वाचावीत म्हणजे माणूस शहाणा होतो, त्यातून प्रश्न मांडता आणि सोडविता येतील, असा सल्ला आहे ढोबळे यांनी दिला. यावेळी माजी मंत्री ढोबळे यांनी अ,ब,,क,ड, नुसार जातनिहाय आरक्षणाचा प्रश्न सविस्तर मांडला. याबाबत आतापर्यंत न्यायाधीशाने काय, काय काम केले आहे, त्यांचा अभ्यास तरी आम्हाला दाखवा, अशी मागणी आपण उच्च न्यायालयापर्यंत जाऊन करणार असून अखरेपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचेही ढोबळे यांनी स्पष्ट केले.
बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे यांनीही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, त्या म्हणाल्या की, जनतेचे पाठबळ आपल्या पदाधिकाऱ्यांना आहे, त्यामुळेच अनेक जण राजकारणात यशस्वी ठरले आहेत. वेगवेगळ्या पदावर निवडून आले आहेत, अनेक मान्यवर आता येथे उपस्थित आहेत. त्यामुळे ज्यांची ताकद आपल्या भागात आहे त्यांनी नक्की राजकारणात उतरावे, आपला बायोडाटा तयार ठेवावा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी करावी. चांगले काम करा. निवडणुकीत उतरा. निवडून या, पद मिळवा. संघटनेबाबत आत्मीयता ठेवा. स्वतः झोकून देऊन काम करा, काही अडचणी आल्या तर आम्ही पाठीशी आहोत. साहेबांनी मोठ्या कष्टाने ही संघटना वाढविली आहे, त्यामुळे चुकीचे कामे करणाऱ्यांना संघटनेत स्थान दिले जाणार नाही. संघटनेच्या आणि साहेबांच्या नावाचा गैरवापर करून आर्थिक तडजोडी करण्याचे प्रकार करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवू, असा इशाराही ऍड. कोमलताई यांनी दिला. दरम्यान, सुनील शिरसागर यांनी अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कार्याची माहिती दिली. यावेळी सरचिटणीस ईश्वर शिरसागर यांनी आभार व्यक्त करताना यापुढे संघटनेत केवळ पद अडवून बसणाऱ्यांना घालवून नवे पदाधिकारी घेतले जातील, असे स्पष्ट केले. मेळाव्यासाठी स्विय सहायक विशाल खंदारे आणि सहकार्यांनी परिश्रम घेतले.
जिल्हाध्यक्षांनीही आपली मत व्यक्त केली
- वर्धा जिल्हाध्यक्ष अजय डोंगरे म्हणाले की, बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून दोन जिल्हा परिषदेच्या जागा आम्ही लढणार आहोत तसेच पंचायत समितीची तयारी केली असून तीन जागा लढवणार आहोत. नगरपंचायतीच्या आठ जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी ठेवली आहे.
- अहिल्यानगरचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड म्हणाले की, राखीव पेक्षा ओपन जागेतून लढण्याची ही तयारी ठेवावी. राखीव जागेत जास्त विरोधक असतात आणि ते आपल्या समाजातील असतात, त्यामुळे ओपन मधून तयारी करण्यास काही हरकत नाही. मी पाच वेळा ओपन जागेतून निवडणूक लढवून जिंकलो आहे. आम्ही जिल्हा परिषदेच्या दोन तर पंचायत समितीच्या तीन जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. पदाधिकाऱ्यांनी आपले मनोबल वाढायला हवे.
- नांदेडचे जिल्हाध्यक्ष साहेबराव गुंडले म्हणाले की, समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणी खूप येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने जात पडताळणीचे प्रमाणपत्र योग्य वेळी मिळत नाही, त्याबाबत आपण काहीतरी ठोस भूमिका घ्यायला हवी.
- नाशिक शहराचे अध्यक्ष अंबादास अहिरे म्हणाले की, नगरपालिकेच्या दोन जागा लढविण्याची तयारी आम्ही केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या संघटनेने निवडणूक प्रभारी पद निर्माण करून त्यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी सोपवावी. मातंग-मातंग अशी गाथा बंद करून आपल्या संघटनेत इतर समाजातील युवकांना पदाधिकारी, कार्यकर्ते पदावर स्थान द्यायला हवे. मी तर म्हणतो ८० टक्के जागांवर बहुजन समाजाचे पदाधिकारी असावेत तर 20 टक्के जागांवर मातंग समाजाचे पदाधिकारी असावेत. शासकीय योजना, अनुदान, जात पडताळणी, माहिती अधिकार अशा बाबींवर प्रशिक्षणाचे आयोजन करावे.

