Advertisement
महाराष्ट्रात सहा हजार कोटी ठेकेदारांची बिलं प्रलंबित आहेत. एस.टी. कामगारांचा कामगारांचा ४४ टके पगार देणे बाकी आहे. चार मागासवर्गीय महामंडळांचा आधार बंद आहे, तर निवडणुकीच्या तोंडावर निर्माण केलेल्या ७० महामंडळावर शिपाई नेमणे बाकी आहे. निराधार कुटुंबाचा डोल सात महिने देता आला नाही. मात्र, प्रत्येक येणाऱ्या दिवाळीला बहिणीच्या ओवाळणीला आधार देणे आवश्यक आहे. वेड्यांनो, रक्षाबंधनाचे पावित्र्य तुम्हाला कळलंय का? अशा बहिणीच्या रक्षाबंधनाचे पावित्र्य सांभाळण आमचं कर्तव्य आहे, असे ना. अजितदादा पवार साहेबांनी मराठी मुलखाला बजावले. हे ना. अजितदादांचे पोलादी शब्द असून कधीच पोकळ होणार नाहीत. म्हणून पुन्हा एकदा सांगोल्याच्या सभेत बहिणीच्या सख्ख्या भावाने अर्थात अनाथाच्या नाथाने लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, हे ठणकावून सांगितले. स्व. दिघे साहेबांच्या दुर्गाडी किल्ल्याच्या सद्गुरूचरणी स्व. दिघे साहेबांचे स्मरण करून उपमुख्यमंत्री अनाथाचे नाथ शिंदे साहेबांनी या योजनेचा पुनरोच्चार केला. निधी अभावी पाण्याच्या योजना रखडल्या आहेत. तर, वैशाखाच्या वणव्यात टँकरची कमतरता भासते आहे. या सर्व गोष्टींमुळे प्रशासनाची तिजोरी मोकळी झाली. तरी ही लाडक्या बहिणीचे मानधन दिलेच पाहिजे, हा सत्तेचा निर्धार आहे.
- प्रा. लक्ष्मण ढोबळे (माजीमंत्री)
प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (एस.पी.)
पंढरीचा भुवैकुंठराणा, पंढरीच्या भुवैकुंठाचा भाऊ पुंडलिकाचे स्मरण करीत मतदार बंधु चंद्रभागेची साक्ष काढत असतात आणि पांडुरंग भक्त पुंडलिक कधीच चंद्रभागेला दगा देणार नाही. परंतु, वारकरी भीती व्यक्त करीत असतात. या कारणे स्वराज्य संस्थांची निवडणूक तोंडावर असताना लाडकी लेक योजना मुळीच बंद होणार नाही. सरकार व्यवहारी असून लाडकी लेकीची योजना अवकाळी ठरवणे कोणत्याही तुघलकी सरकारला परवडणार नाही. याची पुण्याच्या मोतीबागेला जाणीव आहे.
अजूनही लाखो कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होतोय, आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि काकांच्या पुण्याईने आमचं बरं चालल्याची ग्वाही देऊन तिजोरी समृध्द असल्याचा दावा अर्थमंत्र्यांनी केला आहे. याचा अर्थ तिजोरी समृध्द असल्याचा निर्वाळा जाणकार आणि कणखर उपमुख्यमंत्री मधून-मधून देत असतात. परंतु, आज गरीब बहिणीची अवस्था वाईट आहे. नवरा दवाखान्यात, पोराच्या शिकवणीची फी तटली, गेली तीन महिने साडीला पिकोफॉल लावायचा राहून गेलाय, जवळ पैसा नाही. आषाढी वारी पोहोचवायची चिंता वाटते. तरी अर्थमंत्री म्हणतात, कर्ज फेडा ! कर्जफेडीला सरकारजवळ पैसा नाही. अर्थात कर्ज फेडायच राहिलं तरी चालेल, परंतु, लेकी-बहिणीला सांभाळलं पाहिजे. कारण रयतेच्या राजानी जगदंबेचं नाव घेऊन रयतेला सांभाळलं. राज्य केलं. तसं महायुतीच्या त्रिशुळाने देश, देव आणि धर्म सांभाळताना लाडक्या बहिणीचे नाव घेऊन राज्याची धुरा सांभाळली पाहिजे.
बहिणी नियमांच्या बंधनात :
अलीकडच्या काळात वृत्तपत्राचा कागद महागला. संसारातला गसदर वधारला. तर, इंधनाचे दर चंद्राच्या कलेकलेने वाढत आहेत. मोफत मिळणारी वीज मधूनच गायब होते. शेतीला पाणी पाजण्यासाठी रात्री जागरण घडत असते. त्यामुळे शेतीमालाचा दर मध्येच पडतो. आपटी खातो. त्यामुळे शेतकरी आधारहीन झाला आहे. १० वर्षांपूर्वीची चार छावणी मालकांची बिलं देणं अजून बाकी आहे. दावणीच्या मुक्या जनावारांकडे दुर्लक्ष झालं तरी मुकी बिचारी तक्रार करीत नाहीत. परंतु लेकी-बहीणीचा शाप जागृत असतो. जर, बहिणीने शाप दिला, बोटं मोडली तर मोडलेली बोटं आशिर्वादाची की शिव्या शापाची, याचा निर्णय स्थानिक निवडणुकांमधून होईल.
निवडणुकांच्या तोंडावर लाडकी बहीण योजना बंद करणं सत्तेला परवडणार नाही. कारण, प्रति तालुक्याला १० हजारापासून १५ हजारापर्यंत लाभार्थी बहिणीला वगळण्यात आले आहे. बहिणीला दिला जाणारा लाभ पाच कारणं दाखवून नाकारला जात आहे. कुटुंबात नोकरी, अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न, आधारकार्ड अद्ययावत हवे, दारात चारचाक गाडी, इतर कोणताही शासनाचा लाभ नको, या पाच मुद्यांवर महायुतीने भर दिला असून याची झळ राज्यातल्या लाखो लाभार्थी बहिणींना लागली असून लाखो बहिणी लाभापासून वंचित झाल्या आहेत.
देवाभाऊंच्या कानात पांडुरंगाने..... :
दिवाळीला, आली आली वर्षाची दिवाळी, बहीण भावाला ओवाळी!! म्हणून बहीण आदरानं भावाची आरती करते आणि कर्तबगार भाऊ बहिणीच्या आरतीत ओवाळणी ठेवत असतो. ओवाळणाऱ्या बहिणीला अंतर देणे भावाला परवडणार नाही. म्हणूनच हा तुघलकी थाट बहिणीला अपमानित करणारा असून हे वागणं बरं नव्हे, असे मतदारांना सांगायची वेळ आली आहे. गरीब कुटुंबावर हा विश्वासघातकी आघात असून आलेलं संकट मूकपणाने जगणे लेकी-बहिणीच्या नशिबी आले आहे. याकरीताच या जगण्यावर, या मरणावर शतदा प्रेम करावे। हा कवीमनाचा गजर मनाच्या गाभाऱ्यात साठवून ठेवताना जगण्याने छळले होते, मरणाने केली सुटका. हे सुरेश भटांचे गोंजारणे अधिक वास्तव वाटते. आषाढी वारीला पांडुरंगालाच साकडं घालूया. सत्तेची खुर्ची बहाल करणाऱ्या लेकी-बहिणीचा विसर पडू देऊ नका, हे पूजेच्या वेळी देवाभाऊंच्या कानात पांडुरंगानेच सांगावं, असं एकादशीला साकडं घालूया.
