Advertisement
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या प्रवक्ते पदावरील सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या अचानक रद्द करण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे.
16 एप्रिल रोजी शरद पवार गटाच्या बैठकीत पानिपत येथे सरकारकडून बनवण्यात येणाऱ्या स्मारकाला समर्थन नको अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली होती. याला मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी कडाडून विरोध केला आहे. या बैठकीत वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेला केलेला विरोध पाहता महेश तपासे यांची मुख्य प्रवक्ता पदावरून उचलबांगडी करण्यासाठी सर्वच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. महेश तपासे यांचे आजोबा माजी राज्यपाल गणपत तपासे यांनी आधीच पानिपत येथे शौर्य स्मारक बांधले आहे. त्यामुळे तपासे यांनी सरकार बांधत असलेल्या स्मारकाला पाठिंबा दिला आणि पक्षातील नेत्यांची नाराजी ओढावून घेतली आहे. त्याचा परिणाम इतर प्रवक्त्यांवरही पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून यासंदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यामध्ये २३ एप्रिल २०२५, बुधवारपासून प्रवक्ता पदावरील सर्व नियुक्त्या तातडीने रद्द करण्यात आल्याची सूचना देण्यात आली आहे. नव्या प्रवक्ता पदांची नियुक्ती कधी होणार याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.