Advertisement
पुणे : राज्यभरातील स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणूक दिवाळीनंतर होत आहेत. आता, या निवडणुकीत कोण जिंकणार आणि कोण हरणार हा वेगळा चर्चेचा विषय असला तरी राजकारणातील वाढती गुन्हेगारीसह नेत्यांचे गुंड पदाधिकारी , कार्यकतें हा नवा चर्चेचा म्हणण्यापेक्षा चिंतेचा विषय झाला आहे.
राजकीय नेत्यांच्या अंगावरच्या पांढराशुभ्र खादीची भुरळ गुन्हेगारी विश्वातल्या भाईंना पडू लागली आणि राजकीय गुन्हेगारी सुरु झाली. गुन्हेगारीचं स्वरुप बदललं, गुंडही आता राजकीय नेत्यांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करु लागले. राजकीय नेत्यांनाही गुन्हेगारी विश्वातल्या भाईंची राजकारणात गरज होतीच, गुंड यापूर्वी राजकीय नेत्यांचे कधीही कार्यकर्ते झाले नव्हते. गुंड फक्त नेत्यांसाठी लपवून ठेवण्याचं शस्त्र होतं. दहशत माजवण्यासाठी, निवडणुकीत बूथ कॅप्चरिंगसाठी या गुंडांचा वापर केला जात होता. पण, गुंडांसोबत आपलीही गुंड म्हणून गणना होईल या भीतीनं कोणीही गुंडांना कार्यकर्त्यांचा दर्जा दिला नव्हता. पण, राजकीय गुन्हेगारीमुळे गुंड नेत्यांचे कार्यकर्ते म्हणून मिरवू लागले. नेत्यांसोबत पांढरे कुर्ते घालून नेत्यांनी मिरवण्यास सुरुवात केली.
पुणे शहर पेठांच्या बाहेर पडून विस्तारलं, मुळशीपासून तळेगावपर्यंत पुणे शहराची हद्द विस्तारली, जमिनींचे वाढत्या किंमती यातून भाई भूमाफिया झाले. नेत्यांचे हस्तक म्हणून ते राजकारणात वावरू लागले. गुन्हेगारांनाही राजकीय संरक्षण हवं होते. सत्ताधा-यांसोबत असलो की पोलीस हात लावत नाहीत, असं कायम गुन्हेगारांना वाटतं. शिवाय राजकीय नेते वेगवेगळ्या पद्धतीनं या गुन्हेगारांना राजकीय संरक्षणाची सावली देतात. यातून गुन्हेगार राजकीय नेत्यांचे लेफ्ट आणि राईट हँड झाले, तसे गुंडांच्याही राजकीय महत्वाकांक्षाही वाढू लागल्या. गुंड थेट राजकीय पक्षात प्रवेश करू लागले, वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे खांद्यावर मिरवू लागले. गुन्हेगारांचं राजकीयीकरण म्हणजे अनेक गुन्हेगारांचे नातेवाईक, स्वतः गुंड नगरसेवक झाले. काही गुंडांनी त्यापेक्षाही मोठं होण्याची स्वप्नं पाहिली. काही राजकीय नेत्यांनी आपली दोन नंबरची कामं थेट या गुंडांना देऊन टाकली होती. यातूनच पुढे राजकारणातच गुंडगिरी वाढली. मुळातच गुंड असणारेच निवडणूक लढवू लागले.
