Advertisement
चंद्रपूर ; जिल्ह्यातील मूल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार एकता समर्थ आणि काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी डान्सर आणि अभिनेत्री गौतमी पाटीलने मूल शहरात मोठा रोड शो केला.या रोड शोमध्ये अनेक राजकीय कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात हा रोड शो पार पडला.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध लावणी कलावंत गौतमी पाटीलने मूल येथे काँग्रेससाठी प्रचार केला. या 'रोड शो'च्या माध्यमातून काँग्रेसला विजयी करण्याचं आवाहन गौतमी पाटीलने केलं. एकता समर्थ मूल शहरासाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. हे क्षेत्र भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात येत असल्याने इथे शेवटच्या क्षणी काँग्रेसने आपली ताकद पणाला लावली आहे.गौतमी पाटीलची लोकप्रियता पाहता उमेदवारांनी तिचा रोड शो केल्याचं सांगितलं जात आहे. या रोड शोला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला.
यावेळी गौतमी पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाली, "मला इथं येऊन खूप छान वाटत आहे. मी अनेक ठिकाणी जाते. सर्व ठिकाणी मला भरभरून प्रेम मिळत आहे.मूल शहराच्या विकासासाठी काँग्रेस पक्षातील उमेदवारांना आणि नगराध्य पदाकरिता उभ्या असलेल्या एकता समर्थ यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा", असं आवाहनही गौतमीनं यावेळी केलं आहे.
