Advertisement
मंगळवेढा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या योगदानामुळे मंगळवेढ्यात अनेक विकासकामे झाली. शहराच्या व तालुक्याच्या विकासात त्यांचा हातभार लागल्यामुळे मंगळवेढ्याचे वैभव फुलायला लागले परंतु, लोकांना दिलेल्या वेळेत पोहचणारे दादा नियतीने अवेळी हिसकावून नेले, अशा शब्दांत माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या राजकीय प्रवासाला पवार कुटुंबाने हात दिल्यामुळे ते राजकीय उंचीवर पोहोचले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत ते वीस वर्ष सत्तेत होते, अजित पवार यांच्यामुळे त्यांना मंत्रीपद देखील मिळाले होते, त्यामुळे त्यांना या घटनेचे दु:ख सहन झाले नाही, यावर बोलताना माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे म्हणाले की, अजित पवार ज्यावेळी खासदारकीच्या निवडणुकीला उभे होते त्यावेळी त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने डायनामिक डेअरीवर झालेल्या सभेत बोलण्याची संधी मिळाली.
लोकांना काय अपेक्षित आहे यावर काम करणारे ते नेते होते, त्यानंतर मंगळवेढ्याच्या प्रश्नावर विशेषत: उजनी कालव्याची लांबी वाढवून ते मरवडे, कागष्ट, कात्राळ, कर्जाळ, नंदुर, डोणज, हुलजंती या भागापर्यंत पाणी नेण्यांमध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री पद्मसिंह पाटील व अर्थमंत्री अजित पवार यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.
याशिवाय मंगळवेढा शहरातील नगरपालिका इमारत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, 132 केवी सबस्टेशन, 2014 ला मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला दिलेल्या प्रशासकीय मान्यते बरोबर भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत देखील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. शिवाय दामाजी कारखान्याला शिखर बँकेकडून केलेली आर्थिक मदत त्यामुळे अजित पवार आणि मंगळ समीकरण नेहमी जवळचे राहिले.
मंगळवेढ्याच्या प्रश्नावर एक कुठल्याही नेत्यांनी जाऊन समक्ष भेट घेतल्यानंतर तातडीने त्या प्रश्नावर तोडगा निघत असायचा संबंधित अधिकाऱ्यांना त्यावर तत्काळ सूचना देखील दिल्या जायाच्या त्यामध्ये विशेषत: शहराच्या पाणीपुरवठासाठी उचेठाण बंधाऱ्याची निर्मिती, अश्वारूढ पुतळा, सुशोभीकरण या शहराच्या व्यापारी संकुलन या कामाला देखील त्यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे काम केले.
ऊर्जामंत्री असताना मंगळवेढा दौऱ्यावर ज्येष्ठ पत्रकार राम नेहरवे यांनी केलेल्या विजेच्या प्रश्नावर सूचनेची देखील त्यांनी तत्काळ दखल घेऊन अंमलबजावणी केली, त्यामुळे त्यांच्या जाण्याने मंगळवेढेकरांचा चांगला आधार गमावला आहे. अजित दादाच्या अपघाती निधनाची घटना ही मन सुन्न करणारी आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे योगदान मोठे आहे, जनतेच्या प्रश्नासाठी पहाटेपासून तळमळीने काम करणारे ते नेते होते, प्रशासनावर पकड असणारा हा जबरदस्त नेता होता त्यांच्या जाण्याने एक महाराष्ट्राने मोठे नेतृत्त्व हरपले आहे.
कोणत्याही कामासाठी वेळेवर पोहचणारे नेते म्हणून अजितदादांची ओळख होती. मात्र, आज वेळेने दादांना चकवले. त्यांच्या रूपात महाराष्ट्राने मोठे नेता गमावला आहे. आमच्या कुटुंबाला पवार कुटुबीयांना नेहमीच आधार दिला आहे, अजितदादांबरोबर वडीलांना अनेक वर्षे काम केले. मंत्रीमंडळातही दादांमुळे वडीलांना संधी मिळाली, गेल्या काही वर्षांत राजकीय घडामोडीतून विविध निवेदने देताना त्यांना भेटण्याचा योग आला, त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काग्रेसच्या महिला उपप्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी व्यक्त केली.
