Advertisement
विधानसभा पोटनिवडणूक प्रचार तयारी
बारामती : विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रचाराच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो छापण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचाराच्या पोस्टरवर शरद पवार यांचा फोटो वापरण्यात आल्याने नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराच्या पोस्टरवर नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासोबत शरद पवार यांचा फोटा लावण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2 जुलै 2023 ला फूट पडली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा या संदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. सध्या सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरू आहे. या लढाईत पक्ष फुटीनंतर अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांचा फोटो वापरून निवडणुकीत मते मागू शकतात आणि लोकांमधे संभ्रम निर्माण करू शकतात, अशी निवडणूक आयोगात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तक्रार केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तक्रारीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून यशवंतराव चव्हाणांचा फोटो वापरण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर म्हणजेच अडीच वर्षांनंतर पहिल्यांदाच शरद पवारांचा फोटो अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बॅनरवर वापरण्यात आला आहे.
शरद पवार काय म्हणाले?
सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला त्यावेळी एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात बॅनरवर शरद पवारांचा फोटो लावण्यात आला होता. त्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलं असता शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी फोटो वापरण्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. माझा फोटो वापरला असेल तर ते चुकीचं आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते.
