Advertisement
जागा 6 इच्छुक 12 : चुरस वाढली
मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 6 जागा येणार आहे. त्यासाठी राज्यभरातून अनेक नेत्यांनी आतापासूनच सेटींग लावली आहे. भाजपच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी आज रात्री 10 वाजता मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यात बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही नावांमुळे तर मोठी पक्षांतर्गत स्पर्धा निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 6 जागांसाठी 12 नावांची सध्या जोरदार चर्चा आहे. यामध्ये प्रज्ञा सातव, माधवी नाईक, राजेश पांडे, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते, संजय काका पाटील, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी यांचा समावेश आहे. पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. उर्वरित 5 जागांसाठी भाजप जातीय आणि प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न करणार आहे. ही नावे जरी चर्चेत असली तरी भाजपचे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी ही आपण विधान परिषदेत जावे असे वाटत आहे. बाहेरून पक्षात आलेल्यांना आता तरी संधी नको असा सुर एक गटाचा आहे. त्यातूनच पुन्हा एकदा माधव भंडारी, केवश उपाध्ये या सारख्या नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्टींसमोर काय निर्णय घ्यायचा असा प्रश्न आहे.
