Advertisement
पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा पुढाकार
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. रात्रीतून उभारण्यात आलेल्या या पुतळ्यामुळे दोन गट आमने- सामने आले होते, तसेच आंदोलन, दगडफेक आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र अखेर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि नागरिकांच्या बैठकीतून या वादावर तोडगा निघाला आहे.
अंजनगावमधील खोलोबा मंदिराशेजारी 31 मार्च रोजी शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला होता. मात्र, पुतळा मंदिर परिसरात बसवल्याचा आरोप एका गटाकडून करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला आहे. माजी आमदार राजन पाटील आणि जयकुमार गोरे यांनी दोन्ही गटासोबत बैठक केल्यानंतर शिवरायांचा पुतळा ग्रामपंचायतीच्या जागेवर स्थलांतरीत करण्यात आला आहे.
या निर्णयानंतर गावातील तणाव निवळला आहे, शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, गावात सलोखा असताना बाहेरगावाहून आलेल्या लोकांनी गावात वाद निर्माण केल्याचा आरोप माजी आमदार राजन पाटील यांनी केला आहे. राजन पाटील यांनी नाव न घेता लक्ष्मण हाके यांच्यावर टीका केली आहे. मागील दोन दिवस अंजनगावात तणावाचे वातावरण होते, लक्ष्मण हाके यांनी गावात जाऊन ठिय्या आंदोलन केले होते, अनधिकृत पद्धतीने पुतळा बसवल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र, अखेर या वादावर तोडगा निघाला आहे. तसेच पुतळा स्थलांतरीत देखील करण्यात आला आहे. यानंतर जयकुमार गोरे यांनी पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी एक कोटींचा निधी देखील जाहीर केला आहे. त्यामुळे पुतळ्याच्या जागेसोबत सुशोभीकरणाचाही मार्ग मोकळा झाला आहे.
गोरे आणि पाटील यांचे आभार... : ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे
छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे बहुजनांचे दैवत आहे, त्यांचे विचार आचार, जिवन चरित्रावरून आपण सर्वच जण नेहमीच प्रेरणा घेत आलो आहोत, त्यांच्या पुतळ्यावरून होत असलेल्या वादाबाबत चिंता व्यक्त केली जात होती, याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वत: पुढाकार घेत यातून योग्य मार्ग काढला, याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपप्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी म्हटले असून माजी आमदार राजन पाटील यांचेही आभार व्यक्त केले आहेत. गावात शांतात रहावी, अशी अपेक्षाही ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी व्यक्त केली.
