Advertisement
आयुक्तांच्या एका कृतीनं सर्व वारकरी झाले खुश
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे गुरुवारी पुणे शहरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी वासुदेवाची पारंपरिक वेशभूषा परिधान करून वारकऱ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले.आयुक्तांनी ज्ञानोबा-तुकारामांच्या ठेक्यावर ताल धरत वारकऱ्यांसोबत विठ्ठल नामाचा गजरही केला.त्यांच्या या सहभागाने उपस्थित वारकरी आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. "ज्ञानोबा-तुकाराम"आणि "विठ्ठल-विठ्ठल"च्या अखंड जयघोषात दोन्ही पालख्या पुण्यनगरीत दाखल झाल्या. शहरातील विविध मार्गांवर वारकऱ्यांचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.फुलांची उधळण, टाळ-मृदंगाचा निनाद आणि अभंगांच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
प्रथेप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात मुक्कामी राहणार आहे.तर संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल.दोन्ही पालख्या 9 आणि 10 जुलै रोजी पुण्यात मुक्कामी असणार आहेत. या काळात शहरात विविध धार्मिक कार्यक्रम आणि वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात व्यापक वाहतूक नियोजन करण्यात आले असून महापालिका,पोलीस, आरोग्य,अग्निशमन आणि इतर सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध शासकीय विभागांसह स्वयंसेवी संस्थाही कार्यरत असून पुणे शहर पुन्हा एकदा विठ्ठलमय वातावरणाने भारावून गेले आहे.
