Advertisement
रोहित पवार यांनी दिला आंदोलनाचा इशारा
बारामती : महाराष्ट्रामध्ये एमपीएएसीमार्फेत घेण्यात आलेल्या 'औषध निरीक्षक' भरतीचा पेपर फुटल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार म्हणाले की, २९ जुलै २०२५ ला या परीक्षेची जाहिरात आली होती. २२ मार्च २०२६ ला ही परीक्षा पार पडली, ज्यामध्ये ४४ ५०० विद्यार्थी यासाठी बसले होते. १२ जून २०२६ ला या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये नंदुरबारमधील कौटिल्य अकॅडमीचा सहभाग आहे.परीक्षार्थी उमेदवारांच्या मोबाईलवर दोन दिवस आधीच म्हणजे २० मार्च रोजीच प्रश्नांची पीडीएफ कॉपी आली होती. ज्या ज्या उमेदवारांनी पैसे दिलेत त्यांना हे प्रश्न पाठवण्यात आले. मख्य प्रश्नपत्रिकेतील १०० पैकी ९० प्रश्न आधी पेपर लिक झाले होते," असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला आहे.
"ज्याप्रमाणे नीट परीक्षेत पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला तसेच एमपीएससीमध्येही पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला. याचा आका कोण आहे याचा तपास करणे गरजेचे आहे. एक पेपर फोडण्यासाठी १२ लाख रुपये घेण्यात आले. काही मुलांनी याबाबत एमपीएससीकडे २१ जुलै रोजी तक्रारही केली होती. मात्र अद्यापपर्यंत याबाबत कोणतेही उत्तर दिले गेले नाही. याऊलट विदयार्थ्यांनाच अधिकाऱ्यांकडून धमक्या दिल्या जात आहेत," असा गंभीर आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.
दरम्यान, या "प्रकरणी एफआयआर दाखल करावा, फाॅरनसिक माध्यमातून तपास करावा तसेच सीबीआय चौकशी करावी अशा मागण्या रोहित पवार यांनी केल्या आहेत. तसेच या पेपरफुटीप्रकरणी १० दिवसात एमपीएससीने स्पष्टीकरण दिले नाही, तपास केला नाही आणि घाईगडबडीने निकाल फायनल केला तर हे एमपीएससीला आणि शासनालाही महागात पडेल. पुढच्या काही दिवसात आम्ही याबाबत मुंबई किंवा पुण्यामध्ये मोठे आंदोलन काढणार आहोत," असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.
