Advertisement
नाव मतदार यादीत आहे का? कसं तपासणार?
मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानं महाराष्ट्रात मतदार यादीचं विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ सुरु आहे. या प्रक्रियेतील नव्या वेळापत्रकानुसार महाराष्ट्र शासनाच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं आज राज्यातील मतदारांची विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ प्रारुप मतदार यादी जाहीर केली आहे. या यादीतून 2 कोटी 6 लाख 88 हजार 487 नावं वगळण्यात आली आहे. अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी जाहीर केली जाणार आहे. तत्पूर्वी एसआयआर प्रारुप मतदार यादीतून जी 2 कोटींहून अधिक नावं वगळण्यात आली आहेत त्यामध्ये किंवा प्रारुप मतदार यादीत तुमचं नाव आहे का हे कसं तपासायचं हे जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र शासनाच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण-2026 प्रारुप मतदार यादी नुसार सखोल पुनरीक्षणापूर्वी 9,78,54,049 मतदार होते. मात्र, एसआयआर प्रक्रियेनंतर प्रारुप यादीतील मतदारांची संख्या 7 कोटी 71 लाख 65 हजार 562 मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 3 कोटी 95 लाख 89 हजार 905 इतकी आहे. तर, स्त्री मतदारांची संख्या 3 कोटी 75 लाख 72 हजार 570 इतकी आहे. राज्यातील तृतीयपंथी मतदारांची संख्या 3087 इतकी आहे.
महाराष्ट्राच्या विशेष सखोल पुनरीक्षण-2026 प्रारुप मतदार यादीतून वगळलेल्या किंवा गणना न झालेल्या मतदारांची संख्या 2 कोटी 6 लाख 88 हजार 487 इतकी आहे. याची कारणं गैरहजर, स्थलांतरित, मृत, किंवा दुबार नोंदणी अशी आहेत.
वगळलेली नावं कुठं पाहायची?
सीईओ महाराष्ट्रच्या वेबसाईटवरील ASSD LIST (absent shifted dead duplicate) SIR 2026 पर्यायावर क्लिक करा. इथं तुम्ही वैयक्तिक मतदार ओळखपत्र क्रमांक नोंदवून तुमचं नाव वगळलंय की नाही ते पाहू शकता. मतदान केंद्र निहाय वगळलेल्या मतदारांची यादी डाऊनलोड करुन त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे पाहू शकता.
महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक
दावे व हरकतींचा कालावधी: 31 ऑगस्ट 2026 ते 30 सप्टेंबर2026
अंतिम मतदार यादी प्रसिद्धी: 4 नोव्हेंबर 2026
वय अर्हता दिनांक: 1 ऑक्टोबर 2026 (किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण होणारे नवमतदार).
