Advertisement
मुंबई : सोशल मीडियाच्या जगात दररोज अनेक व्हिडीओ समोर येत असतात, पण काही व्हिडीओ थेट काळजाला भिडतात. असाच एक अत्यंत भावूक आणि सुंदर व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका 80 वर्षांच्या वृद्ध आजोबांनी आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच विशाल समुद्र पाहिला आहे. दूरवर पसरलेल्या अथांग लाटा आणि समुद्राचे अक्राळविक्राळ रूप पाहताच हे आजोबा इतके भावुक झाले की त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता झुकून जलदेवतेला हात जोडून प्रणाम केला. पांढरे शुभ्र कपडे घातलेले आणि हातात काठी घेतलेल्या या आजोबांच्या डोळ्यांत समुद्राला पहिल्यांदा पाहण्याचा आदर आणि आनंद स्पष्टपणे दिसतो.
हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने शूट केला असून त्याने त्याच्या वृद्ध वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ओडिशातील जगन्नाथ आणि कोणार्क मंदिराच्या दर्शनासाठी नेलं. याच दरम्यान हा वृद्ध व्यक्ती पहिल्यांदाच समुद्र किनारी पोहोचला. व्हिडीओमध्ये दिसतंय की, आजोबा आपल्या मुलाचा हात धरून हळूहळू वाळूवरून पुढे जात आहेत. जशा समुद्राच्या थंडगार लाटा त्यांच्या पायाला स्पर्श करतात, तसे ते प्रचंड भावुक होतात. त्यानंतर ते लगेच खाली वाकतात, समुद्राचे पाणी हातात घेतात आणि अत्यंत भक्तिभावाने ते पाणी आपल्या कपाळाला लावतात. वयाच्या या टप्प्यावर निसर्गाचे हे भव्य रूप पाहणे त्यांच्यासाठी एका अध्यात्मिक अनुभूतीसारखे होते.
हा व्हिडीओ केवळ आजोबांच्या भावुक क्षणांचाच नाही, तर बाप-लेकाच्या सुंदर नातेसंबंधाचे उत्तम उदाहरण ठरत आहे. आपल्या वृद्ध वडिलांचे हे लहानसे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलाने ज्या प्रकारे त्यांचा हात धरून त्यांना समुद्रावर आणले, त्याने लाखो लोकांची मनं जिंकली आहेत.
ही आहे लिंक
www.youtube.com/@bhukkhad.musafir?sub_confirmation=1
