Advertisement
पंढरपूर : शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. केद्र सरकारकडे रोजगार हमी योजनेच्या बिलाचे राज्याचे 3 हजार कोटी रुपये अडकल्याचे वक्तव्य गोगावले यांनी केलं आहे. ते पैसे आले की ठेकेदारांचे पैसे देणार असल्याचेही ते म्हणाले. रोजगार हमी योजनेतील अनेक ठेकेदारांची बिल रखडली आहेत. याबाबत गोगावले यांना विचारले असता ते बोलत होते. आज गोगावले पंढरपूरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
रोजगार हमी योजनेतील अनेक ठेकेदारांची बिले रखडली असून केंद्राकडे सरकारचे 3000 कोटी रुपये अडकले आहेत असे वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केले. ते पैसे आल्यानंतर गेल्या तीन-चार वर्षांपासून थकलेली ही बिले दिली जातील असे भरत गोगावले म्हणाले. यामध्ये केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून महाराष्ट्राला 3 हजार कोटी रुपये मिळणार आहेत. ही रक्कम केंद्राकडे आहे. याबाबत शिवराज सिंह चव्हाण यांना जास्तीत जास्त रकमेची मागणी केली असून ते पैसे आल्यावर थकीत बिले दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शरद पवारांनी पूर्वीच्या काळात मराठा आरक्षण प्रश्न निर्णय घ्यायला हवे होते, या विखे पाटील यांच्या विधानाबाबत गोगावले यांनी सावध प्रतिक्रिया दिली. जुन्या काळात अटी शर्ती फारशा नव्हत्या. त्यावेळी निर्णय घेतला असता, तर यांचा फायदा समाजाला झाला असता, असे विखे पाटील यांना वाटले असेल. तर पवारांनी करायला हवे होते, अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिली आहे.
