Advertisement
माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांची माहिती
सोलापूर : अनुसूचित जाती-जमाती आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी राज्य शासनाने तातडीने करावी, या मागणीसाठी आत्तापर्यंत राज्यभरात ७१ मोर्चे निघाले आहेत. येत्या १९ सप्टेंबरला मुंबईत महाएल्गार मोर्चाचे आयोजन केले आहे, आम्ही मातंग बांधव-भगिनींसह मोर्चा घेऊन मुंबईत मंत्रालयाला धडकणार, असे माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितले.
अनुसूचित जाती-जमाती आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी राज्य शासनाने तातडीने करावी, या मागणीसाठी सोलापूर शहर जिल्हा सकल मातंग समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महाएल्गार मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री ढोबळे बोलत होते.
सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा मार्गस्थ झाला. नवी वेस पोलीस चौकी, महात्मा फुले पुतळा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, रामलाल चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिद्धेश्वर मंदिर मार्गे जिल्हा परिषद पूनम गेटपर्यंत मोर्चा निघाला. यावेळी हाती फलक घेतलेल्या कार्यकत्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.
पूनम गेटवर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासह माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी आमदार रमेश कदम, अविनाश बागवे, प्रा. मच्छिद्र सकटे, अजिंक्य चांदणे, सचिन साठे, अभिजीत ढोबळे, मारुती वाडेकर, विष्णू कसबे, शंकर तडाके यांनी अनुसूचित जाती-जमाती आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी करत याबाबत विचार व्यक्त केले. यावेळी विजय अंभोरे, प्रा. सुकुमार कांबळे, पंडित सूर्यवंशी, अशोक लोखंडे, जोशीला लोमटे, सुरेश पाटोळे, गोविंद कांबळे, रोहन लोंढे, उमेश काळे, सुभाष शिंदे, पृथ्वीराज मोरे, महादेव भोसले यांच्यासह हजारो कार्यकर्ते आणि मातंग बांधव मोर्चात सहभागी झाले होते.
मोर्चातील प्रमुख मागण्या
अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे तातडीने उपवर्गीकरण करून आरक्षणाचे लाभ समन्यायी पद्धतीने वितरित करा, अनुसूचित जातीचे 'प्रगत' आणि 'वचित' असे दोन गट करा, अनंत बदर समितीचा अहवाल लागू करा, तेलंगणा, हरियाणा, कर्नाटक आणि पंजाब या राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करा, उपवर्गीकरण होईपर्यंत राज्यातील अनुसूचित जातीच्या आरक्षणाशी संबंधित कोणतीही नोकरभरती करू नये, १९७८ ते २०२६ या कालावधीत बार्टीच्या माध्यमातून जातनिहाय मिळालेल्या लाभांची श्वेतपत्रिका जाहीर करा.
दोघे सरकारवर दबाव आणत आहेत
प्रकाश आंबेडकर व आनंदराज आंबेडकर हे विनाकारण विरोध करत समाजात दरी निर्माण करत आहेत. सुप्रीम कोर्टाने सकारात्मक निर्णय दिला आहे. राज्य सरकारला वर्गीकरण करण्याबाबत आदेशही दिले आहेत. मात्र हे दोघे सरकारवर दबाव आणत आहेत. आरक्षण वर्गीकरणाला विरोध म्हणजे आंबेडकरी विचारांशी केलेला द्रोह.
- रमेश कदम, - माजी आमदार
सांगा बाळासाहेब, आम्ही गद्दार कसे ?
सुशीलकुमार शिंदे यांनी मातंग समाजासाठी अभ्यास आयोग दिला, मागील लोकसभेत मातंग समाजाने सुशीलकुमार शिंदे यांच्याऐवजी बाळासाहेब आंबेडकर यांना मदत केली. मग आम्ही गद्दार कसे? असा प्रश्न अजिंक्य चांदणे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना केला.
