Advertisement
सोलापूर : सोलापूर शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच माजी नगरसेवकावर भरदिवसा झालेल्या हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. सिंधी समाजाचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक लालचंद वाधवानी यांच्यावर एका व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या संपूर्ण प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाधवानी उभे असतांना आरोपी अचानक त्यांच्याजवळ आला. त्याने हातातील धारदार शस्त्राने वाधवानी यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी घटनास्थळी सुमारे 50 ते 60 नागरिक उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. भर गर्दीत हा हल्ला झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावर न थांबता तेथून पळ काढला. तो आपल्या दुचाकीवरून निघून गेला. विशेष म्हणजे, आरोपी ज्या जुन्या हिरो होंडा दुचाकीवरून आला होता, ती नंतर सुरू होत नसल्याचेही सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. त्यामुळे त्याने काही अंतर गाडी ढकलत नेल्याची माहिती समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोराचे वय जास्त असल्याचे दिसून येत आहे. त्याने अचानक वाधवानी यांच्यावर हल्ला करून काही क्षणांतच घटनास्थळ सोडले. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या लालचंद वाधवानी यांना उपचारासाठी सोलापुरातील आसरा चौक परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यामागे जुना वाद किंवा पूर्ववैमनस्य असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
