Advertisement
अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचा सवाल : आंदोलन राजकीय असल्याच्या टीकेवर कोमलताईंचा पलटवार
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, पेपरफुटी, परीक्षा पद्धती, पारदर्शकता आणि आयोगाच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित करीत पुण्यात स्पर्धा परीक्षार्थींचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांसोबत ठिय्या देत पाठिंबा दिल्यानंतर आंदोलनाला राजकीय रंग दिला जात असल्याची टीका सुरू झाली आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी एखादा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार रोहित पवार हे आंदोलनस्थळी थांबले म्हणून संपूर्ण आंदोलनाला राजकीय ठरविणे योग्य नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) महिला उपप्रदेशाध्यक्षा अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी मांडली आहे.
“एमपीएससीचे विद्यार्थी आपल्या भवितव्याशी संबंधित प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. त्यांचे प्रश्न ऐकून घेणे आणि त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली, त्यांच्यासोबत ठिय्या मांडला; त्यामुळे या आंदोलनाची दखल इतर राजकीय नेत्यांनाही घ्यावी लागली. त्यामुळे आता आमदार रोहित पवार आंदोलनात का बसले, यावर चर्चा करण्यापेक्षा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सरकार आणि आयोगाकडे काय उत्तर आहे, यावर चर्चा झाली पाहिजे,” असे अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील आंदोलनात सुरवातील आमदार रोहित पवार हे सहभागी झाल्यानेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. याशिवाय एमपीएससीच्या प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील नेत्यांमध्येही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आंदोलन राजकीय असल्याची टीका काही नेत्यांकडून केली जात असताना, विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या भवितव्याचा प्रश्न हा केंद्रस्थानी राहिला पाहिजे, असेही कोमलताई यांनी म्हटले आहे.
“रोहित पवार कोण आहेत, त्यांच्या घराण्याचा इतिहास काय आहे, त्यांच्या घरात किती पैसा आहे, यावर चर्चा करण्यात वेळ घालविण्यापेक्षा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना ज्या प्रश्नांनी रस्त्यावर आणले आहे, त्या प्रश्नांची उत्तरे शोधा. विद्यार्थ्यांना पारदर्शक परीक्षा प्रक्रिया हवी आहे, त्यांच्या कष्टाला न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे. या मागण्यांवर ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात कोणता नेता बसला, यापेक्षा विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होणार आहेत की नाही, हा खरा प्रश्न आहे,” असेही असे अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी स्पष्ट केले.
“विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला कोण भेटले, कोण बोलले, कोणत्या पक्षाचा नेता आला, यापेक्षा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण कधी होणार, हे महत्त्वाचे आहे. एमपीएससीसारख्या संस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास टिकविण्यासाठी पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आवश्यक आहे. सरकारने आणि आयोगाने विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या रास्त मागण्यांवर ठोस भूमिका स्पष्ट करावी,” अशी मागणी अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केली.
