Advertisement
सोलापुरात सकारात्मक बैठक : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील विविध प्रलंबित समस्या आणि नागरिकांच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आणि तरुणांच्या विविध प्रश्नांवर या बैठकीत गांभीर्याने चर्चा करण्यात आली असून, हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत सकारात्मक संवाद साधला गेला. या संदर्भातील सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले.
या बैठकीबाबत आणि तालुक्याच्या प्रश्नांविषयी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला उपप्रदेशाध्यक्ष ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सविस्तर माहिती दिली.
काही दिवसांपूर्वीच मंगळवेढा तालुक्यातील स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने तालुक्यातील विविध मागण्यांचे निवेदन आमदार रोहित पवार यांना देण्यात आले होते. या निवेदनाची तत्परतेने दखल घेत, रोहित पवार यांनी तातडीने सोलापूर प्रशासनासोबत या विशेष बैठकीचे आयोजन केले.
बैठकीदरम्यान तालुक्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीवर तातडीने उपाययोजना कराव्यात, शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळावी आणि स्थानिक तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत विविध योजना राबवाव्यात, अशी ठाम मागणी आमदार पवार यांनी प्रशासनाकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनीही या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला असून, हे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष, सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. "जनतेच्या आणि तालुक्याच्या हक्काच्या विकासासाठी आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढ्याच्या विकासाचा हा लढा असाच तीव्र गतीने पुढे सुरू राहील," असा विश्वास या प्रसंगी ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे व उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
