#

Advertisement

Wednesday, October 21, 2026, October 21, 2026 WIB
Last Updated 2026-10-21T15:24:21Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

दुष्काळी तालुक्यांत टँकर सुरू; चारा छावण्यांसाठीही पाठपुरावा करणार !

Advertisement

ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांची माहिती; लोकप्रतिनिधींच्या नियोजनशून्यतेवर जोरदार टीका

सोलापूर : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे टँकर तातडीने सुरू करावेत, अशी मागणी आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला उपप्रदेशाध्यक्षा ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली होती. या मागणीची दखल घेत प्रशासनाने दुष्काळी तालुक्यांमध्ये टँकर सुरू केले आहेत. निवेदनाची तातडीने दखल घेत दुष्काळी तालुक्यात पाण्याचे  टँकर सुरू केल्याने सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी श्री. एस. कार्तीकेयन (IAS) यांचे ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी आभार मानले. जनावरांसाठी चारा छावण्या आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळवून देण्यासाठीही पाठपुरावा करणार असल्याचे कोमलताईंनी स्पष्ट केले.
दुष्काळामुळे शेतकरी आणि ग्रामीण जनतेसमोर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीच्या उपाययोजनांसोबतच आगामी काळाचे नियोजन करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत, त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, दुष्काळाच्या नियोजनातील दिरंगाईवर कोमलताईंनी लोकप्रतिनिधींना धारेवर धरले. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पुढील तीन महिन्यांतील पाणीटंचाई आणि संभाव्य संकटाचा आढावा घेऊन उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र, उन्हाळा आणि पावसाळाही संकटात गेल्यानंतर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. वेळेत नियोजन करण्याची जबाबदारी असताना लोकप्रतिनिधी झोपले होते का? आता जलसिंचनाच्या बैठका घेऊन केवळ दिखाऊपणा करण्याचा प्रयत्न होत आहे का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवर टीका केली. दुष्काळग्रस्तांना आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष मदतीची गरज आहे. त्यामुळे पाणीपुरवठा, जनावरांसाठी चारा आणि शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी ठाम भूमिका ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी मांडली.