Advertisement
पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई
नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रावादीचे नेते नितेश कराळे मास्तर यांनी बंडखोरी केली आहे. यानंतर पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. कराळे मास्तर यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभिजीत वंजारी यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने याबाबत अधिकृत पत्राक जारी केले आहे. पक्ष शिस्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी नितेश कराळे गुरुजी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. नागपूर पदवीधर निवडणुकीत पक्षाच्या निर्णयाचा विरोधात जाऊन अपक्ष उमेदवारी अर्ज भरणे आणि आपल्याला शरद पवारांचा आशीर्वाद निवडणुकीत असल्याचा संभ्रम निर्माण केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. पक्षाचे सरचिटणीस रविंद्र पवार यांच्या सहीचे कारवाई करणारे पत्र जारी करण्यात आले आहे. नितेश कराळे गुरुजी सोशल मीडियात वादग्रस्त वक्तव्य आणि आपल्या शिकवण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे प्रसिद्ध आहेत. गेल्या काही दिवसांपासून कराळे यांनी आघाडीविरोधात प्रचार केला होता. आता मतदानाच्या अवघ्या काही तासापूर्वी झालेल्या या कारवाईचा निवडणुकीवर काय परिणाम होणार, याकडे लक्ष लागले आहे.
निवडणुकीत शरद पवारांचा आशिर्वाद असल्याचे सांगणे ही आपली कृती पक्षाची शिस्त, धोरणे आणि महाविकास आघाडीच्या निर्णयांचे स्पष्ट उल्लंघन करणारी आहे. यामुळे, पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष / वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्देशानुसार आपणास पक्षातून सहा वर्षांकरिता निष्कासित करण्यात येत आहे, याची आपण नोंद घ्यावी असं पत्रात म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभिजीत वंजारी यांना पूर्ण पाठिंबा ही जाहीर केला आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजित वंजारी यांच्याविरोधात निवडणूक लढवणं आणि शरद पवारांचा पाठिंबा आपल्याला असल्याचा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केल्याचा ठपका नितेश कराळे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कराळे यांनी आघाडीविरोधात प्रचार करत होते.

