#

Advertisement

Friday, October 2, 2026, October 02, 2026 WIB
Last Updated 2026-10-02T14:46:30Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

MPSC सचिव महेंद्र हरपाळकरांची अखेर उचलबांगडी

Advertisement

पुणे : एमपीएससी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांना आणि आंदोलनाला मोठे यश आले आहे. विद्यार्थ्यांच्या तीव्र असंतोषानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र उत्तमराव हरपाळकर यांची अखेर बदली करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
पुण्यात 2 ऑक्टोबरला होणाऱ्या नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, 30 सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमपीएससी विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली होती. या चर्चेदरम्यान विद्यार्थ्यांनी आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याबाबत आपल्या प्रमुख मागण्या मांडल्या होत्या. कायद्याच्या चौकटीनुसार अध्यक्षांचा राजीनामा घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत, मुख्यमंत्र्यांनी सचिवांची तातडीने बदली करण्याचे आश्वासन दिले होते. विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी दिलेला हा शब्द मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्याची प्रतिक्रिया आमदार विक्रम पाचपुते यांनी दिली.
महेंद्र हरपाळकर यांची एमपीएससीच्या सचिव पदावर दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर निवड करण्यात आली होती. मात्र, विद्यार्थ्यांचा वाढता दबाव आणि प्रशासकीय बाबींचा विचार करून त्यांची ही प्रतिनियुक्ती तात्काळ प्रभावाने संपुष्टात आणण्यात आली आहे. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार आयोगाच्या अध्यक्षांच्या संमतीने त्वरित अन्य अधिकाऱ्याकडे सोपवावा, असे निर्देश या आदेशात देण्यात आले आहेत. हरपाळकर यांच्या नवीन पदस्थापनेबाबतचे आदेश नंतर स्वतंत्रपणे काढले जातील. या निर्णयामुळे एमपीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, राज्य सरकारच्या सकारात्मक भूमिकेचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे.