Advertisement
एआय डेटा सेंटर प्रकल्पावरून सचिन कल्याणशेट्टी यांना ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचा सवाल
सोलापूर : उजनी धरण परिसरात प्रस्तावित एआय डेटा सेंटर प्रकल्पावरून सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला उपप्रदेशाध्यक्षा ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी पाण्याच्या प्रश्नावरून प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. तसेच अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर विनाकारण राजकीय टीका करू नये, अशी भूमिका मांडली आहे.
उजनी धरणातील पाणी हे सोलापूर जिल्ह्याच्या शेतीसाठी, पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी तसेच मासेमारी व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या पाण्यावर हजारो शेतकरी, स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांचे जीवन अवलंबून आहे. अशा परिस्थितीत प्रस्तावित एआय डेटा सेंटरसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होणार असल्यास भविष्यात स्थानिक नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर आणि शेतीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रकल्पाच्या औद्योगिक फायद्यांबरोबरच पाण्याच्या उपलब्धतेचा आणि स्थानिकांच्या हिताचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक असल्याचे ॲड. कोमलताई यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, भाजपच्या वतीने ३१ ऑक्टोबर रोजी सोलापुरात प्रकल्पाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी ‘दहा रोहित पवार आले तरी माघार नाही’, अशी आक्रमक भूमिका घेतली. मात्र, उजनीच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित करणे हा राजकारणाचा विषय नसून तो शेतकरी, नागरिक आणि भविष्यातील पाणी सुरक्षिततेशी संबंधित आहे.
प्रकल्पाच्या समर्थनार्थ भूमिका मांडताना आमदार रोहित पवार यांच्यावर वैयक्तिक किंवा राजकीय टीका करण्यापेक्षा उजनीच्या पाण्याचा वापर, स्थानिकांना होणारे संभाव्य परिणाम आणि पाणी व्यवस्थापन यावर स्पष्ट भूमिका मांडणे गरजेचे आहे. विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या पाण्याच्या हक्काकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी भूमिका ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी मांडली.
