#

Advertisement

Friday, November 13, 2026, November 13, 2026 WIB
Last Updated 2026-11-13T13:30:17Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापुरातील प्रत्येक बेकरीमध्ये ‘बन’ मिळतात !

Advertisement

 

भाजप प्रवक्त्याच्या वक्तव्यांचा ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी घेतला खरपूस समाचार

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून आमदार रोहित पवार यांच्यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला उपप्रदेशाध्यक्षा ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आमदार रोहित पवार यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःची राजकीय पात्रता तपासावी, अशा शब्दांत त्यांनी भाजप प्रवक्त्यांचा समाचार घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून रोहित पवार यांनी केलेल्या विधानांवर नवनाथ बन यांनी टीका केली होती. रोहित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपद मिळाले नसल्याने ते अस्वस्थ असून, आगामी काळात काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा किंवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होण्याचा प्रयत्न करतील, असा दावा बन यांनी केला. तसेच, रोहित पवार हे राज्यातील सर्वाधिक अहंकारी आमदार असल्याची टीकाही त्यांनी केली होती. या वक्तव्यांचा समाचार घेत ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी बन यांच्या नावाचा थेट उल्लेख टाळत उपरोधिक शब्दांत निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, असले बन सोलापुरातील प्रत्येक बेकरीमध्ये मिळतात. ग्रामीण भागात तर त्यांची सायकलवरून विक्री केली जाते. मात्र, त्यांना मस्का लावणारे वेगळेच आहेत. शरद पवारांच्या राजकीय संस्कारात वाढलेल्या आणि जनतेतून निवडून आलेल्या आमदार रोहित पवार यांच्यावर अशा खालच्या शब्दांत टीका करणे योग्य नाही, असेही कोमलताईंनी स्पष्ट केले.
राजकीय मतभेद असणे स्वाभाविक असले, तरी एखाद्या लोकप्रतिनिधीवर वैयक्तिक स्वरूपाची टीका करणे ही राजकीय संस्कृती नव्हे. रोहित पवार यांनी मांडलेल्या भूमिकेला राजकीय मुद्द्यांच्या आधारे उत्तर देण्याऐवजी त्यांच्यावर अहंकाराचे आरोप करणे, हा भाजप प्रवक्त्यांचा राजकीय स्तर असल्याचा अप्रत्यक्ष टोला ॲड. कोमलताईंनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा आणि रोहित पवार यांची राजकीय भूमिका यावरून कोमलताईंच्या आक्रमक प्रतिक्रियेमुळे भाजपच्या टीकेला राष्ट्रवादीकडून ठाम प्रत्युत्तर मिळाले आहे. राजकीय टीका करताना वैचारिक आणि सभ्यतेची मर्यादा पाळली पाहिजे, हा संदेश त्यांच्या प्रतिक्रियेतून अधोरेखित झाला आहे.