Advertisement
32 आमदारांची उपस्थिती ; बैठकीत नेमकं काय घडलं
मुंबई : राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेली गृहमंत्री अमित शाहांची भेट, अंतर्गत वाद आणि अर्थमंत्रीपदाची मागणी यावरुन सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चर्चेत आहे. त्यातच, आज मुंबईतील देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली असून आमदारांनी सत्तेतील शिवसेना पक्षाबद्दल आपली नाराजी बालून दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 3 तासांपासून देवगिरी निवासस्थानी बैठक सुरू होती. या बैठकीला 30 पेक्षा जास्त आमदार उपस्थित होते. बैठकीत आमदारांना येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या भावना व्यक्त करण्याची सूचना वरिष्ठ नेतृत्वाकडून करण्यात आली होती. आमदारांकडून बैठकीत बोलताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमधे सुरू असलेल्या संघर्षाबाबत विचारणा करण्यात आली. सध्या वरिष्ठ नेत्यांमधे जे वाद सुरू आहेत, त्याबाबत खाली आमच्यापर्यंत काहीच कळत नाही. वरिष्ठ नेत्यांमधे सुरू असलेल्या संघर्षाच्या बाबी सातत्याने समोर येत असल्यामुळे पक्ष कमजोर होतं असल्याची भावना आमदारांनी व्यक्त केली. आपला पक्ष सत्तेत असून देखील कामे होत नाहीत. एकनाथ शिंदे यांच्याकडून कामे होतं नसल्याची काही आमदारांची तक्रार होती. तसेच, पक्षातील एका माजी मंत्र्यांकडून बोलताना अर्थमंत्री पदाबाबत नेमकं काय झालं? याबाबतही विचारणा करण्यात आली.
दुष्काळ दौरा करण्याच्या आमदारांना सूचना
सत्तेच असूनही कामं होत नाहीत, शिंदेंच्या शिवसेनेकडून आमदारांची कामं होत नसल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या आमदारांनी केल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच माजी मंत्र्यांकडून अर्थमंत्री पदाबाबत काय झालं, अशी विचारणा वरिष्ठांकडे करण्यात आली. तर, पक्षातील अंतर्गत संघर्षाबाबत आमदारांनी विचारणा केल्याची माहिती आहे. दरम्यान, दुष्काळ असल्याने आमदार म्हणून आपण दुष्काळी दौरा केला पाहिजे, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिल्या आहेत.
पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर चर्चा
पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीतील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्दीकी आणि राष्ट्रीय प्रवक्तेपदी उमेश पाटील यांची निवड करताना, वरिष्ठ नेत्यांना, कोअर कमिटीतील सदस्यांना विचारणा करण्यात आली नाही. त्यामुळे, वरिष्ठांनी नाराजी दर्शवली, तसेच यापुढे वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घ्यावे, असेही सूचवण्यात आले. त्यावर, पार्थ पवार आणि जय पवार यांनी वरिष्ठांसमवेत चर्चा करुन निर्णय घेतले जातील, असा विश्वास व्यक्त केला.
