Advertisement
मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता विधान परिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेनं आपल्या आमदाराला निवडणुकीच्या दोन दिवसांआधीच आमदारांना हॉटेलमध्ये हलवण्याची व्यवस्था केली आहे. तर भाजपनेही आपले आमदार आता मुंबईतील प्रसिद्ध अशा ताज हॉटेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती समोर आली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी 10 जागांसाठी 20 जून रोजी निवडणूक होणार आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात असल्यामुळे घोडेबाजाराला पुन्हा ऊत येणार आहे. त्यामुळे कागदावर सोपी वाटणारी निवडणूक ही प्रत्यक्षात मात्र अवघड अशीच आहे. भाजपने पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अलीकडे भाजप नेत्यांची बैठक पार पडली होती. त्यानंतर आता भाजपच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. 18 तारखेपासून भाजप आमदारांचा हॉटेलवर मुक्काम असणार आहे. मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल ताज प्रेसिडेंनसमध्ये भाजपच्या सर्व आमदारांचा मुक्काम असणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा भाजपच्या आमदारांना याच हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. विधान परिषद निवडणुकीची पूर्ण जबाबदारी आशिष शेलार, गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात
भाजप 1) प्रवीण दरेकर 2) राम शिंदे 3) श्रीकांत भारतीय 4) उमा खापरे 5) प्रसाद लाड
शिवसेना : 1) सचिन अहिर 2) आमशा पाडवी
काँग्रेस : 1) चंद्रकांत हंडोरे 2) भाई जगताप
राष्ट्रवादी काँग्रेस : 1) रामराजे नाईक निंबाळकर 2) एकनाथ खडसे