Advertisement
नवी दिल्ली : शिवसेना आणि एकनाथ शिंदे प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली, यावेळी शिवसेना आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही गटाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास कोर्टाने सांगितले आहे. या प्रकरणावर आता 1 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. तसंच मंगळवारपर्यंत शिवसेना आणि शिंदे गटाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास आदेश दिले आहे.
शिवसेनेकडून शिंदे गटाने शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळे याचिका दाखल करण्यात आली आहे. आज सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश एन.व्ही. रामन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पीठापुढे ही सुनावणी पार पडली. शिवसेनेच्या 5 याचिकांवर सुनावणी झाली. एकनाथ शिंदेंच्या वतीने वकिल हरिश साळवे , निरज कौल यांनी युक्तिवाद केला. तर शिवसेनेच्या वतीने वकिल कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. तर राज्यपालांच्या वतीने वकील तुषार मेहता यांनी बाजू मांडली.
'बंडखोरांचा मुद्दा हा न्यायप्रवीष्ठ होता पण तरीही एकनाथ शिंदे यांचा शपथविधी पार पडला. राज्यपालांनीही या आमदारांच्या गटाला बहुमत चाचणी घेण्यास परवानगी दिली. हे सगळं न्यायाची पायमल्ली करण्याची घटना होती. राज्यपालांनी शिंदे यांना शपथ दिली. त्यांना माहिती होत की, शिंदेंच्या अपात्रेचा मुद्दा हा उपाध्यक्षांकडे प्रलंबित आहे. जोपर्यंत कुठलाही सदस्य पात्र आहे की अपात्र आहे, हे सिद्ध होत नाही. पण राज्यपालांनी सभागृहात बहुमत चाचणी करण्यास परवानगी दिली. ज्या प्रकार उपाध्यक्षांवर कारवाई करण्यात आली तशीच कारवाई बहुमत चाचणीवरही करता यायला हवी होती, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.
शिंदे गटाकडून वकील हरीश साळवे यांनी बाजू मांडली.
शिंदे गटाला अपात्र ठरवण्याचा मुद्दा इथं लागू होत नाही. शिंदे गटाने अजूनही शिवसेना सोडलेली नाही. ज्याच्याकडे जास्त जागा आहे तो लिडर असल्याचं सांगत आहे. हेच विधानसभा अध्यक्षांनी मान्य केलं आहे. त्यामुळे शिंदे गट अपात्र ठरू शकत नाही, असा युक्तिवाद साळवे यांनी केला. यावर कोर्टाने तुम्ही हायकोर्टामध्ये का गेला नाही, असा सवाल केला आहे. हे प्रकरण संवदेनशील आहे. जर आमदारांनी पक्ष सोडला आहे, तर फुटला कसा? असा सवालही केला आहे. तर, आम्हाला आठ दिवसांची मुदत वाढवून द्यावी, या प्रकरणावर काही घटनात्मक मुद्दे आहे. त्या मांडण्यासाठी वेळ हवा आहे, अशी मागणी साळवे यांनी केली. हरीश साळवे यांनी 8 दिवसांची मुदत मागितल्यामुळे शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार आक्षेप घेतला.
