Advertisement
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील 39 आमदारांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी जाऊन शिंदे आणि भाजपने राज्यात सरकार स्थापन केलं. भविष्यात बंडखोर आमदारांचं मन दुसरीकडे वळू नये, यासाठी पुरेपूर खबरदारी घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांसाठी डिनर डिप्लोमसीचं आयोजन केलं आहे. या गोष्टीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून उद्या ट्रायडन्ट हॉटेलमध्ये आमदारांना डिनर दिला जाणार आहे. तर उपमुख्यमंत्र्यांकडून रविवारी दोन्ही पक्षाच्या आमदारांना डिनर दिलं जाणार आहे. राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीकरता या स्नेहभोजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारची ही डिनर डिप्लोमसी आहे. दोन्ही पक्षांच्या आमदारांना एकत्रित डिनरसाठी बोलावलं जाणार आहे. दरम्यान राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपर्यंत आमदारांना मुंबई न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण, राज्यावर अतिवृष्टीचं संकट ओढवलेलं असताना सत्ताधारी पक्ष फाईव्ह स्टार हॉटेलमधून आमदारांच्या जेवणावळी उठवताहेत, हे बरोबर नाही जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.
