Advertisement
नाशिक : जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे चित्रा डोखळे, शारदा डोखळे,अश्विनी महाले आणि शीतल डोखळे या चारही महिला राहतात. कोरोना काळात घरी असताना आपण काही तरी स्वतःच केलं पाहिजे असे यांच्या मनात सतत विचार येत होते. कारण फक्त शेतीवर अवलंबून राहणे सद्या अवघड झालं आहे. शेत मालाला कधी भाव मिळतो तर कधी मिळत नाही म्हणून त्यांनी घरच्या घरी मसाला उद्योग सुरू करण्याचे ठरवले. कारण मसाला बनवण्यासाठी बरेच साहित्य हे शेतकऱ्यांकडून मिळत असते. त्यामुळे जवळच्याच शेतकऱ्यांकडून साहित्य घेऊन त्यांनी घरगुती मसाला उद्योग सुरू केला आहे आणि बघता बघता त्यांच्या या मसाल्याला मागणी वाढली असून अगदी जपानला सुद्धा त्यांच्या मसाल्याची विक्री होत आहे.
मसाला बनवण्याची माहिती ही त्यांनी बाहेरून घेतली. मात्र, आपण आपला स्वतःचा ब्रँड तयार करूयात असा विचार करून त्यांनी 'कृषी कन्या फूड प्रोडक्ट्स' हा ब्रँड तयार करून त्याअंतर्गत तब्बल 9 प्रकारचे मसाले तयार केले आहेत. काळा मसाला, पावभाजी मसाला, सांबर मसाला, गावरान कणी मसाला, पनीर मसाला, बिर्याणी मसाला, चिकन मटण मसाला, कांदा लसूण मसाला, किचन किंग मसाला अशी नावे दिली. आता, घरगुती मसाला उद्योगामध्ये महिन्याकाठी तब्बल दीड लाखांचा नफा मिळतो. सोबतच देशाबाहेर सुद्धा मसाल्याची विक्री केल्या जाते. अधिक माहितीसाठी 9270057065 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.
