Advertisement
दोंडाईचा/धुळे : साहित्य रत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या आयुष्यामध्ये लोकनाट्य, प्रचंड अशी साहित्य संपदा या मराठी मायभूमीसाठी निर्माण केली आहे. 32 कादंबऱ्या, 13 कथासंग्रह, पोवाडे, लोकगीते, प्रवास वर्णन, लोकशाहिराच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबईला वाचविण्याचे काम त्यांच्या शाहीरीने केले, अशा लोकशाहिराचा, साहित्यरत्नास भारतरत्न पुरस्कार देऊन मरणोत्तर गौरव होणे हा अवघ्या महाष्ट्राचा व मातंग (हिंदू दलितांच्या) अस्मितेचा विषय आहे. आपण केंद्र शासनाकडे या संदर्भातील ठराव पाठवावा, अशी मागणी महाराष्ट्रातील बहुजन रयत परिषदेतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना दोंडाईचा (ता.शिंदखेडा, जि.धुळे) येथे उत्तर महाराष्ट्र बहुजन रयत परिषदेचे नाशिक विभाग अध्यक्ष रवींद्र वाकळे यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, हिंदू दलित चळवळीचे गाढे अभ्यासक, शब्दप्रभू माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या निर्देशानुसार फडणवीस यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात माजी मंत्री ढोबळे यांनी म्हटले आहे की, मातंग समाज हा स्वातंत्र्यानंतरही महाराष्ट्रात उपेक्षित जीवन जगत आहे. अनुसूचित जातीत 59 जातींचा समावेश असून स्व. गोपीनाथ मुंडे यांनी छ.ढ.(भटक्या प्रवर्गाचे)अ,ब,क,ड आरक्षण सरकारच्या इच्छाशक्तीने महाराष्ट्रात लागू करून इतिहास घडविला, तसे धाडस आपण करून उपेक्षितांना उपकृत करावे, अशी मातंग समाजाची रास्त मागणी आहे.
दि. 1 ऑगस्ट 2022 लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 102वी जयंती आहे. या पुरोगामी महाराष्ट्राने नुकताच कोरोना काळात अण्णाभाऊंच्या जयंतीचा जन्मशताब्दी वर्ष साजरा केला, त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन करतांना वरील प्रमाणे समाजाच्या अपेक्षा लक्षात घेता महोदय आपण मागणीप्रमाणे निर्णय घेणे अपेक्षित आहे.
या महाराष्ट्राचे पालनकर्ते आपण असून आपल्या नेतृत्वाकडून आम्हा तमाम बहुजन रयत परिषद उत्तर महाराष्ट्रातील मातंग समाजाला मोठी अपेक्षा आहे. आमच्या संघटनेचे संस्थापक आपचे दैवत माजी मंत्री, शब्दप्रभु हिंदू दलित चळवळीचे गाढे अभ्यासक प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या निर्देशानुसार सदर निवेदन सादर करीत आहोत. कृपया सादर दोन्हीही मागण्यांचा विचार होऊन आम्हा समस्त राज्यातील मातंग समाजाला न्याय द्यावा व अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा तसेच अ,ब,क,ड प्रमाणे आरक्षणाची वर्गवारी करावी, असे बहुजन रयत परिषद उत्तर महाराष्ट्र नाशिक विभागाचे अध्यक्ष रवींद्र वाकळे यांनी नमूद केले.
