Advertisement
नवी दिल्ली : एकीकडे शिवसेनेचे आमदार फुटल्यानंतर आता त्यांचे खासदारही फुटीच्या मार्गावर आहेत. शिवसेनेच्या लोकसभेतल्या 18 खासदारांपैकी 12 खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना खासदार राहुल शेवाळे या गटाचे प्रतोद असतील, तसंच हे खासदार पत्र घेऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना उद्या भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये आहेत. या खासदारांना घेऊन शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याचीही शक्यता आहे.
एकीकडे दिल्लीमध्ये या घडामोडी घडत असतानाच शिवसेनेनेही पावलं उचलायला सुरूवात केली आहे. शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं आहे. आमचे गटनेते विनायक राऊत आहेत तसंच मूळ शिवसेना आमचीच आहे, हे या पत्रात सांगण्यात आलं आहे. लोकसभा अध्यक्षांना हे पत्र देण्यासाठी विनायक राऊत, राजन विचारे, बंडू जाधव, अनिल देसाई आणि अरविंद सावंत गेले होते. विनायक राऊत हे शिवसेनेचे गटनेते तर राजन विचारे हे प्रतोद आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या लोकसभा खासदारांना व्हीप बजावण्याचा तसंच लोकसभेत कोणाला मतदान करायचं, हे सांगण्याचा अधिकार विचारे यांना आहे. तुमच्याकडे जर कोणी खासदार गटनेता किंवा प्रतोद म्हणून पत्र घेऊन आला तर त्या पत्रावर कोणतीही कार्यवाही करू नका. आमच्या खासदारांपैकी कोणी असं पत्र घेऊन आलं, तर मला माहिती द्या, अशी विनंती विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
