#

Advertisement

Monday, July 18, 2022, July 18, 2022 WIB
Last Updated 2022-07-18T18:05:29Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

शिवसेनेला माजी खासदार आढळराव पाटील यांचा "जय महाराष्ट्र' ?

Advertisement

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा सोमवारी दुपारी सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची नवीन राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली असून यामध्ये आढळराव पाटील यांची उपनेते म्हणून निवड करण्यात आली, त्यामुळे ते शिंदे गटात गेल्याचे सांगितले जात आहे.
महाविकास आघाडीचे सरकार झाले. तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर जाऊ नये, अशी भूमिका पहिल्यांदा खासदार शिवाजीराव पाटील यांनी मांडली होती. त्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसची जुळवून घ्या, असे सांगण्यात आले होते. मात्र, गेली अडीच वर्षे मतदारसंघात कामे करत असताना आढळराव पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबर असलेल्या संघर्षाबाबत वारंवार बोलून दाखवत होते; मात्र त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यातूनच शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. मात्र, काही वेळातच आढळराव पाटील हे शिवसेनेत असून त्यांची हकालपट्टी करण्यात आली नसल्याचे पत्र शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले. पत्रकात आढळराव-पाटील हे शिवसेना उपनेते म्हणून शिवसेनेतच कार्यरत राहतील, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली होती. यानंतर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेत पक्षावर व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला असलेल्या काही नेत्यांवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आढळराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यावर झालेल्या प्रकरणावर पडदा पडला होता. झालेल्या प्रकाराबाबत आढळराव पाटील प्रचंड नाराज होते ते भाजप किंवा शिंदे गटात जाणार अशी चर्चा रंगली होती. अखेर त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.


शरद सोनवणे यांनी दिला जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा
जुन्नर तालुक्‍याचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा नुकताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. मागील दोन वर्षांपासून पुणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. एक शिवसैनिक म्हणून मी आपला प्रथम ऋणी आहे. मागील तीन वर्षांपासून आपले सरकार आले आणि भाजपसोबत आपली 25 वर्षांपासूनची जी युती होती ती आपआपसांतल्या भांडणामुळे तुटली. आपण महाविकास आघाडी सरकार स्थापनेचा निर्णय घेतला; परंतु पश्‍चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीमुळे शिवसैनिक खचत व संपत चालला होता. काही दिवसांपूर्वी आम्ही आपणास भेटलो असताना तुम्ही आम्हाला सांगितले की, नाईलाजाने आपल्याला कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीशी तडजोड करून इथून पुढच्या काळात काम करावे लागेल. वरच्या पातळीचे राजकारण वेगळे आहे; पण खालच्या तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्याच राजकारणी नेहमीच संघर्षाचे राहिला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीशी आमचे मनोमीलन होणार नाही. यामुळे पदाचा सन्मान ठेवून माझे जिल्हाप्रमुख पद आपल्याकडे सुपूर्द करत आहे. आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी पुन्हा एकदा कार्यरत राहणार आहे. ही जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी आपण दुसऱ्या कोणालाही द्यावी, इच्छा नसतानाही मी आपल्यापासून बाजूला होत आहे, असे सोनवणे यांनी पत्रात नमूद केले आहे.