Advertisement
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशीच त्यांना डिवचलं आहे. शिंदे यांनी शिवसेनेचे नवे सचिव, खजिनदार आणि प्रवक्त्यांच्या नावांची घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे यांनी किरण पावसकर, संजय मोरे यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती केली आहे. तर डॉक्टर बालाजी किणीकर यांना खजिनदार करण्यात आलं आहे. दीपक केसरकर हे आधीपासूनच मुख्य प्रवक्ते म्हणून काम पाहत होते. केसरकरांच्या जोडीला आता गुलाबराव पाटील, उदय सामंत, किरण पावसकर आणि शीतल म्हात्रे यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या सचिवपदी नेमणूक करण्यात आलेले किरण पावसकर हे कामगार नेते आहेत, तर संजय मोरे हे ठाण्याचे माजी महापौर आहेत. खजिनदार म्हणून नेमणूक झालेले बालाजी किणीकर अंबरनाथचे आमदार आहेत. याशिवाय शितल म्हात्रे या दहिसरच्या माजी नगरसेविका आहेत. गुलाबराव पाटील आणि उदय सामंत हे आमदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही नियुक्ती पत्र सादर करण्यात आली.
