Advertisement
मुंबई : महाराष्ट्रातला ओबीसी आरक्षणाचा मार्ग सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर आता महाविकासआघाडी आणि भाजपने याचं श्रेय घ्यायला सुरूवात केली आहे. महाविकासआघाडीने नेमलेल्या बांठिया आयोगामुळेच ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला, असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणाले आहेत. तर मागच्या 15 महिन्यांमध्ये महाविकासआघाडीने सुप्रीम कोर्टात नीट बाजू मांडली नाही, पण राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील मिळाल्याचं भाजप नेते सांगत आहेत. या श्रेयवादाच्या लढाईमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मला श्रेयवादामध्ये पडायचं नाही. प्रयत्न कोणाचेही असोत, मी आनंद साजरा करणार आहे. तसंच योग्य डेटाबेस असावा यासाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
या लढाईमध्ये ओबीसी समाजाने खूप संयम ठेवला. ओबीसीशिवाय निवडणूक म्हणजे काळा दिवस झाला असता. आमच्या सरकारने हे करून दाखवलं. ओबीसी हिताचं सरकार आल्यानं हे शक्य झालं. श्रेयवादाच्या पलीकडे जाऊन ही लढाई आहे.ओबीसींसाठी कोण झटलं हे जनता बघते. महाविकासआघाडीने प्रयत्न केले नाही. इम्पिरिकल डेटा, जनसंख्या हीच कारणं दिली. पक्षाच्या पलिकडे कोर्टात युक्तीवाद झाला,' अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.
