Advertisement
मुंबई : रायगडच्या हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर एक बोट दुर्घटना अवस्थेत सापडली आहे. या बोटीत 3 AK-47 आणि काडतुसं सापडली. या बोटीचं नाव लेडी हान आहे, तसंच ही बोट ऑस्ट्रेलियन आहे. ऑस्ट्रेलियन महिलेची ही बोट असून या बोटीचा कॅप्टन महिलेचाच नवरा आहे. एका कोरियन युद्ध नौकेने त्याला मदत केली आहे. ही बोट मस्कतवरून युरोपला जात होती, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
या संशयास्पद बोटीमध्ये 3 एके 47 रायफल्स आणि 225 राऊंडस आढळून आले आहेत. या घटनेचा तपास दहशतवादविरोधी पथक करत आहे. याचा बारकाईने तपास सुरू आहे, सर्व भागात नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सणांच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट देण्यात आले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांच्यासोबत को ऑर्डिनेशन सुरू आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं. 26 जूनला या बोटीचं इंजिन निकामी झालं त्यानंतर कोरियन युद्धनौकेनं त्यांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्द केले.समुद्र खवळला असल्याने बोटीचे टोईंग करता आले नाही. समुद्रातल्या अंतर्गत प्रवाहामुळे ही नौका भरकटत हरिहरेश्वरच्या किनाऱ्याला लागली आहे, अशी माहिती फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
