Advertisement
बीड : मंत्रिमंडळामध्ये पंकजा मुंडे यांना संधी मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, पण असं झालं नाही. मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याबद्दल पंकजा मुंडेना विचारलं असता त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. तुमचं नाव कायम चर्चेत असतं पण मंत्रिपद मिळत नाही, असा प्रश्न विचारला असता चर्चेत असण्यासारखंच नाव आहे ना, काय वाईट आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. 'तेवढी माझी पात्रता नसेल, अजून पात्रतेची लोक असतील, जेव्हा माझी पात्रता वाढेल तेव्हा देतील. त्याबद्दल मला काही आक्षेप नाही. मी जे काम करते ते स्वाभीमानाने करते आणि इज्जतीने राजकारण करते', असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे त्या मंत्रिपद मिळालं नसल्यामुळे नाराज आहेत का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. 'मंत्रिमंडळामध्ये महिला असली पाहिजे. महिला म्हणजे महिला बालकल्याण. मुस्लिम म्हणजे अल्पसंख्याक, आदिवासी म्हणजे आदिवासी विभाग, असं नाही पाहिजे. मागच्यावेळी मला महिला बालकल्याणसह ग्रामविकासही देण्यात आलं होतं, याचं कौतुक. महिलांना संधी दिली पाहिजे, पण महिला बालकल्याणच्या पलिकडे जाऊनही दिली पाहिजे', असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
