Advertisement
भोसरी : समाजसुधारक, लोककवी, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये उभारण्यात आला आहे. अण्णा भाऊ यांच्या लिखाणाची, कार्याची दखल रशियन सरकारने घेतल्याबद्दल आपल्या केंद्र तसेच राज्य सरकाकडून अभिनंदनाचा ठरावही संमत करण्यात आला. या प्रक्रियेत आपल्या भोसरी मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांचाही सहभाग असल्याने त्यांचेही खूप खूप आभार, अशा शब्दांत बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी आमदार लांडके यांची या कार्याबाबत ऋतज्ञता व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान असलेल्या अण्णा भाऊंनी 1961 मध्ये रशियाचा दौरा केला होता. शिवाय त्यांनी स्टालिनग्राडचा पोवाडाही लिहिलेला आहे, त्यांच्या या योगदानाची दखल घेत रशियाच्या मॉस्को येथील "मार्गारिटा रूडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर' संस्थेच्या प्रांगणात अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला आहे, ही बाब अभिमानास्पद आहे, त्यामुळे याबाबत अभिनंदनाच्या पत्राबाबतचा ठराव विधानसभेत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी मांडला होता. त्यांच्यासह माळशिरसचे आमदार राम सातपुते, अमरावतीचे आमदार रवी राणा, पुण्याचे आमदार सुनील कांबळे, उमरखेडचे आमदार नामदेव ससाणे आदी आमदारांनी हा ठराव सभागृहात संमत करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली होती. यानुसार सदर ठराव संमतही करण्यात आला. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांचे खूप खूप आभार तसेच अभिनंद. यासह आमदार सुनील शेळके तसेच अन्य आमदारांचेही आभार, अशा शब्दांत ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी ऋतज्ञता व्यक्त केली आहे.