Advertisement
राज्य विधिमंडळ सभागृहात एकमताने अभिनंदनाचा ठराव संमत
मुंबई : थोर मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक अण्णा भाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये उभारण्यात आला आहे. परिवर्तनाला दिशा व चालना देणारे अण्णाभाऊ यांचे सातासमुद्रापार झालेल्या या सन्मानाबद्दल आज राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.मार्क्सवादी-आंबेडकरवादी विचारांचे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान होते. 1961 मध्ये अण्णाभाऊ साठे यांनी रशियाचा दौरा केला होता. 40 दिवसांच्या रशिया दौऱ्यावरील अनुभव-कथन करणारे "माझा रशियाचा प्रवास' हे पुस्तक त्यांनी लिहिले होते. शिवाय त्यांनी स्टालिनग्राडचा पोवाडाही लिहिला होता. रशियाच्या मॉस्को येथील "मार्गारिटा रूडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर' संस्थेच्या प्रांगणात अण्णाभाऊ यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. हा पुतळा बसविण्यात आल्याने त्या संस्थांच्या अभिनंदनाचा ठराव आज राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने संमत करण्यात आला. विधानसभेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तर विधान परिषदेत सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हा अभिनंदनाचा ठराव मांडला, त्यावर दोन्ही सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवून या ठरावाचे स्वागत केले.
2020 हे वर्ष अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. त्यांचा रशियात अर्धाकृती पुतळा बसविणे ही बाब देशाची शान व मान वाढणारी आहे, असे मत दोन्ही सभागृहात व्यक्त करण्यात आले. विधान परिषदेत शिक्षक आमदार नागो गाणार यांनी हा ठराव सभागृहात संमत करण्यासाठी सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पत्र देत त्यासाठी मागणी केली होती. तर, विधानसभेत भोसरीचे आमदार महेश लांडगे, माळशिरसचे आमदार राम सातपुते, अमरावतीचे आमदार रवी राणा, पुण्याचे आमदार सुनील कांबळे, उमरखेडचे आमदार नामदेव ससाने आदी आमदारांनी हा ठराव सभागृहात संमत करावा, अशी मागणी विधानसभा अध्यक्षाकडे पत्र देऊन केली होती.
मार्गारिटा रूडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर ही संस्था मॉस्को शहराच्या मधोमध आहे. संस्थेत उभारण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण पुढील महिन्यात 14 सप्टेंबर रोजी केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रातील आणि राज्यातील काही मंत्री, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, भारतातील अनेक मान्यवर यासह जगभरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
