Advertisement
मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. भाजपकडून मिशन मुंबईला सुरुवात करण्यात आल्याची चर्चा आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. पण शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. मुंबई महापालिकेत भाजप सत्तेत आणण्याच्या या ध्येयाला मिशन मुंबई असं नाव देण्यात आलं आहे. हे मिशन साध्य करण्यासाठी अगदी तशाच घडामोडी घडताना दिसत आहेत.
भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष आशिष शेलार यांचा मुंबई पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. या दोघांचा मुंबईच्या विविध भागात सत्कार करण्यात आला. या दोघांनी मिळून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमधील 3 महत्वाच्या ठिकाणांना भेट दिली. दादर चैत्यभूमी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रतिष्ठान या तीनही ठिकाणी या दोघांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
